Vinod Tawde, Eknath Khadse, Pankaja Munde | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास महाविकासआघाडीने हिरावून घेतल्याने भाजप (BJP) सध्या सत्तावियोगाचे दु:ख भोगत आहे. तर 'मी परत येईन.. मी परत येईन' असे मोठ्या छातीठोकपणे सांगणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सत्तावापसीचे स्वप्न भंगले. या सर्व प्रकारामुळे भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली. गेली पाच वर्षे सत्तेत बसलेला भाजप सध्या विरधी पक्षात बसण्याची मानसिक तयारी करु लागला असतानाच भाजपला पक्षातील जेष्ठ आणि जनाधार असलेल्या नेत्यांकडून हादरे बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पास्टवरुन त्या नाराज असल्याची चर्चा रंगली असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्याबाबतही प्रसारमाध्यमांतून तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजपला बंडखोरांचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार भाजपमध्ये बंडाचा झेंडा हातात घेणारे सर्व नेते हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले किंवा तिकीट कापले गेलेले आहेत. विशेष म्हणजे भाजपमधील काही बंडखोर नेते असे आहेत की, ज्यांना चक्क भाजपच्या अधिकृत उमेदवारांपेक्षाही अधिक मतं मिळाली आहेत. तर काहींना भाजप उमेदवारांपेक्षा कमी मतं मिळाली असली तरी, त्यांनी लक्षवेधी मतं मिळवली आहेत. या बंडखोरांना 30 ते 90 हजारांच्या आसपासही मतं मिळाली आहेत. त्यामुळे या बंडखोरांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

दरम्यान, भाजपमधील बंडखोरांच्या अस्वस्थतेला आणखीही एक किनार आहे. ती म्हणजे राज्यातील सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपला आपल्या भूमिकेमुळे विरोधात बसावे लागले. भाजपने शिवसेना पक्षासोबत थोडीशी जरी लवचिकता दाखवली असती तरी, भाजप आज सत्तेत असता. भाजपच्या या भूमिकेचा परिणाम राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर वेगळे चित्र दिसले तर या बंडखोरांची गोची होऊ शकते. (हेही वाचा, शरद पवार यांनी दाखला देताच शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी झाल्या राजी, उलघडलं गुपीत)

महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल

विधानसभा सभागृहात असलेली पक्षनिहाय बलाबल पाहता भाजप (BJP) – 105, शिवसेना (Shiv Sena) – 56, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) – 54, काँग्रेस(Congress) – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 असे संख्याबळ आहे. शिवसेना-भाजप विधानसभा निवडणूक 2019 युतीद्वारे लढले होते. त्यामुळे आकड्यांवर नजर टाकता भाजपने लवचिकता दाखवली असती तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार सहज अस्तित्वात येऊ शकत होते. मात्र, तसे घडले नाही. त्यामुळे भाजपतील पराभूत आणि बंडखोर जेष्ठ नेते नाराज असल्याचे समजते.