Uddhav Thackeray, Varsha Bunglow (Photo Credits: PTI, File Image)

महाराष्ट्रात अखेर सत्तेचं कोडं सुटलं असून शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन केलं आहे. 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांतील प्रत्येकी 2  आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. आणि सामान्य प्रशासन विभागाने आता या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप देखील केले आहे.

बंगला वाटपाचा शासन निर्यण महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सो. ना. बागुल यांनी नुकताच जाहीर केला आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या मंत्र्याला मिळणार सरकारी निवासस्थानाच्या रूपात कोणता बांगला आणि आधी त्या बंगल्यात कोण राहायचं,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारतर्फे वर्षा बांगला देण्यात आला आहे. हा बांगला मुंबईतील मलबार हिल येथे असून आधी यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहत होते. परंतु, भाजप सरकार स्थापन न करू शकल्यामुळे त्यांना हा बांगला सोडावा लागला आहे. मात्र आता देवेंद्र फडणवीस हे सध्याचे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना मलबार हिल येथीलच सागर बांगला देण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानानंतर दुसरं महत्त्वाचं ठिकाण ठरतं 'रामटेक'. समुद्रकिनारी असलेला रामटेक बांगला मिळवण्यासाठी अनेक नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. आता मात्र हा बांगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांना देण्यात आला आहे. या आधी, एकनाथ खडसे या बंगल्यात वास्तव्याला होते.

तिसरा महत्त्वाचा बांगला म्हणजेच 'सेवासदन' हा मिळणार आहे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना. या आधी, माजी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे या बंगल्यात राहत होते. परंतु त्यांना हा बांगला आता सोडावा लागणार आहे.

तर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेला 'रॉयल स्टोन' हा बांगला आता मिळाला आहे शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांना.