शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अधिकृतरित्या युती तोडली नसली तरी, शिवसेनेने जवळजवळ विरोधी पक्षाची भूमिका लोकसभेत घेतल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री पदावरून सुरु झालेल्या दोन्ही पक्षांतील मतभेदांमुळे, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा हात पकडला तर दुसरीकडे भाजपला मात्र एकटं सोडलं.
अशा परिस्थितीतही शिवसेनेकडून एक नवा प्रस्ताव भाजपला आल्याचं रामदास आठवले यांनी एएनई ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ते म्हणाले की त्यांनी संजय राऊत यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना कॉल केला होता. आणि या कॉल दरम्यान त्या दोंघांमध्ये एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. रामदास आठवले म्हणाले की, "3 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री आणि 2 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला झाल्यासशिवसेना नक्की एकत्र येण्याचा पुन्हा विचार करेल असं संजय राऊत म्हणाले."
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना, "शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनाच विचारा सरकार कसं बनवणार," असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नक्की राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेना पक्षाला सत्ता स्थापन करण्यास मदत करणार की शिवसेनेला भाजपसोबतच मिळेल ते स्वीकारून सत्ता स्थापन करावी लागणार हे लवकरच कळेल.