महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात जवळपास 20 वर्षांनी प्रथमच बिनविरोधचाची परंपरा मोडीत निघाली. परिणामी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) जाहीर झाली. एकेकाळचे मित्रपक्ष असलेले शिवसेना (Shiv Sena)-भाजप (BJP) कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून आमनेसामने उभे राहिले आणि संख्याबळाचे गणित जमवताना अपक्षांचा भाव भलताच वधारला. आता या अपक्षांनी सत्ताधारी महाविकासआघाडी म्हणजेच शिवसेना आणि प्रबळ विरोधक असलेल्या भाजपच्या नाकात दम आणला आहे. दोन्ही बाजूला (शिवसेना, भाजप) आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या मतांजी गरज आहे. ही गरज फक्त अपक्ष आणि छोटे पक्षच पूर्ण करु शकतात. त्यामुळे त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चुरस लागली आहे.
महाविकासआघाडी आणि विरोधक यांना पाठिंबा देणारे आपापले अपक्ष आहेत. असे असले तरी काही अपक्षांनी आयत्या वेळी बंडाचा झेंडा, तर काहींनी अचानक मतदारसंघ निधी, वैचारिक भूमिका आणि मानापमान असे विविध मुद्दे उकरुन काढले आहेत. त्यामुळे त्यांच्या नाकदुऱ्या काढण्यातच सत्ताधारी आणि विरोधकांना ताकद खर्ची करावी लागत आहे. प्रत्यक्ष मतदानास अवघे अगदी काहीच कालावधी शिल्लख असल्याने समर्थक अपक्ष आमदार आणि नाराज आमदारांना गळाला लावण्यासाठी फोनाफोनी सुरु आहे. सत्ताधारी, विरोधकांकडून आलेल्या फोनला उत्तर देताना महामंडळ, देवस्थान मंडळ, निधी, विचार करुन सांगतो अशी मोगाम उत्तरे दिली जात असल्याचेही समजते. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणूक अटळ; अर्ज मागे घेण्याची मुदत संपली, शिवसेना, भाजप, काँग्रेस नेत्यांकडून दणादण प्रतिक्रिया)
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, समाजवादी पक्षाकडे दोन आमदार आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी महाविकासआघाडीच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालायतून फोन गेल्याचे समजते. सपाकडूनही सकारात्मक अश्वासन गेल्याचे समजते. बहुजन विकासआघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनाही शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही बाजूंनी साकडे घातले जात आहे. शिवसेना नेत्यांनी नुकतीच हिंतेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. दरम्यान, भाजपचे गिरीश महाजन हे देखील हितेंद्र ठाकूर यांना भेटून आले आहेत. त्यामुळे ठाकूर यांचे पारडे कोणाच्या बाजूने झुकते याला महत्त्व आले आहे.
दुसऱ्या बाजूला कट्टर वैचारिक विरोधक असलेल्या शिवसेनेने एमआयएम आमदारांना राज्यसभेसाठी पाठिंबा मागितल्याचा दावा केला जातो आहे. एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दावा केला आहे की, कृषीमंत्री दादा भुसे यांनी पाठिंब्यासाठी आपली भेट घेतली होती. दरम्यान, एमआयएम आमदारांबाबत पक्षाचे नेते असदुद्दीन औवेसी निर्णय घेतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीने पाठिंब्यासाठी आम्हाला विचारावे, असे खुद्द एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनीच म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही काल चंद्रपूर येथील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
व्हिडिओ
एकूणच घडामोडी पाहता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडीक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही उमेदवार कोल्हापूरमधील आहेत. त्यामुळे या राजकारणाला एक वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. आमदारांचा कौल कोणाला याबाबत लवकरच स्पष्टता येणार आहे.