भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे पाठीमागील काही दिवसांपासून आजारी आहेत. असे असले तरी राज्यसभा निवडणूक 2022 (Rajya Sabha Election 2022) साठी होणाऱ्या मतदानासाठी आज (10 जून 2021) ते विधिमंडळात दाखल होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला आहे. असे असले तरी ते रुग्णवाहिकेद्वारे (Ambulance) मुंबईला रवाना झाले आहेत. सांगितले जात आहे की, सुरुवातीला लक्ष्मण जगताप हे एअर अँब्युलन्सने मुंबईला येणार होते. मात्र, आता ते अँब्युलन्सने मुंबईला रवाना होतील. सकाळी साडेआठच्या सुमारास लक्ष्मण जगताप हे पुण्याहून मुंबईला रवाना झाले. राज्यसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला आमदाराचे एक एक मत अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत आपल्या आमदाराचे मत तर गमवायचे नाहीच. पण, त्यासोबतच विरोधी पक्षाची मते कशी कमी करता येतील तेवढी करायची, असे प्रयत्न आहेत. असे असताना प्रत्येक मताचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व आमदार विधिमंडळात मतदानासाठी येतील यासाठी सर्व राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
लक्ष्मण जगताप हे पाठिमागील दोन महिन्यांपासून प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त आहेत. मधल्या काळात त्यांचा आजार इतका बळावला होता की, ते कोमातही गेले होते. दरम्यान, कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जून रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांची एकूण प्रकृती पाहता मुंबईला पाठिविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय राजी नव्हते. त्यांची एकूण आवस्था पाहिली तर जगताप यांच्या आरोग्यावर अधिकचा ताण येईल, अशी कुटुंबीयांची भूमिका होती. मात्र, पक्षादेश असल्याने आपण मतदानाला जाणार असे लक्ष्मण जगताप यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ते पुण्याहून मुंबईला रवाना झाले आहेत. (हेही वाचा, Rajya Sabha Election In Maharashtra: राज्यसभेसाठी आज मतदान, पराभूत होणारा सातवा उमेदवार कोण? राजकीय वर्तुळात उत्सुकता, निकालाकडे लक्ष)
आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, एअर अँब्युलान्सच्या माध्यमातून मुंबईला जाण्याचा आमचा विचार होता. मात्र, सातत्याने हवामान बदल होत असल्याने त्यांना महामार्गानेच मुंबईला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार आता रस्तेमार्गे मुंबईला जाण्याचा निर्णय घेतल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यसभेसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्ता भरणे यांनी पहिल्यांदा मतदान केले आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान कालावधी असेल. त्यानंतर आजच संध्याकाळी 5 वाजता मतमोजणी होऊन निकालही जाहीर केला जाईल. राज्यसभेसाठी 288 पैकी 285 आमदार मतदान करणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे सध्या कोठडीत आहेत. त्यामुळे सध्या तरी त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. परिणामी मतदान करणाऱ्या आमदारांचा आकडा 285 वर आला आहे.