राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election 2022) भाजपने सातवा उमेदवार उभा केल्याने रंगत वाढली आहे. राज्यसभेसाठी या वेळी महाराष्ट्रातून सहा जागा असताना भाजपने सातवा उमेदवार उभा केला. त्यामुळे सहापैकी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार? म्हणजेच सातवा उमेदवार कोण ठरणार याबाबत उत्सुकता आहे. अर्थात संख्याबळाच्या जोरावर सर्वच पक्षाचे पहिला आणि दुसरा असे पहिले पाच उमेदवार सहज विजयी होणार आहेत. कसोटी असणार आहे सातव्या उमेदवारासाठी. राज्यसभेसाठी आज (10 जून) मतदान पार पडत आहे. त्यामुळे आमदार कोणाला मतदान करतात यावर सर्वच काही अवलंबून असणार आहे.
राज्यसभा निवडणुकीत एक बाब नक्की आहे. कोणीतरी एक सातवा उमेदवार पराभूत होणार आहे. त्यामुळे कोणता उमेदवार विजयी होणार यापेक्षा कोणता उमेदवार पराभूत होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने आपला अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. संख्याबळ दोघांकडेही नाही. त्यामुळे शिवसेना (महाविकासआघाडी) आणि भाजप या दोघांकडे अपक्ष आमदारांच्या मतांना पर्यय नाही. पर्यायाने दोन्ही बाजूंची सगळी भीस्त ही अपक्ष आमदारांवरच आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2022: एमआयएमची दोन मते कोणाला? अखेर सस्पेन्स संपला, खासदार इम्तियाज जलील यांनी केली घोषणा)
राज्यसभा निवडणुकीत महाविकासआघाडीने केलेल्या मतांच्या गोळाबेरजेला न्यायालयाने काहीसा धक्का लावला. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत. त्यांना तुरुंगातून मत देण्याचा अधिकार बजावता यावा यासाठी न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे महाविकासाघाडीला जवळपास चार मतांचा खड्डा (प्रत्येकी दोन) पडला. आता उच्च न्यायालयातून दिलासा मिळाला, असा प्रयत्न केला जात आहे.
संख्याबळाचे गणित पाहता उमेदवारांच्या विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 41.01 मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, या पक्षांचे पहिले दोन उमेदवार सहज निवडून येणार आहेत. खरी गंमत आहे काँग्रेस आणि शिवसेनेच्या सहाव्या जागेसाठी सर्व मदार ही अपक्षाच्या मतांवर असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 29 मते ही अपक्ष आणि छोट्या पक्षांची आहेत.