Congress | (File Photo)

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय नाट्य रंगले. या नाट्याचा उत्तरार्ध अद्याप बाकी आहे. तोवरच गुजरात (Gujarat) काँग्रेसमध्येही जोरदार उलथापालथ घडली आहे. गुजरातमधील 4 काँग्रेस आमदारांनी आपले राजीनामे ( 4 Congress MLAs resign) दिले आहेत. राज्यसभा निवडणूक 2020 (Rajya Sabha Election 2020) लागली असताना आमदारांनी राजीनामे देणे म्हणजे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला जोरदार आव्हान दिले होते. या वेळी गुजरातमध्ये भाजपची सत्ता जाते की काय अशी स्थितीही निर्माण झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळाली नसली तरी आमदारांची संख्या मात्र चांगलीच वाढली होती.

जेव्ही काकडिया, प्रवीण मारू, प्रद्युमन सिंह जडेजा आणि सोमाभाई पटेल अशी राजीनामा दिलेल्या आमदारांची नावे आहेत. गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी या चारही आमदारांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. त्रिवेदी यांनी म्हटले आहे की, या चारही आमदारांनी राजीनामा दिल्याचे विधिमंडळात सोमवारी जाहीर करण्यात येईल.

राज्यसभा निवडणुकीमुळे गुजरातमध्ये राजकीय वातावरण गरम आहे. 182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधिमंडळात काँग्रेस पक्षाकडे 73 आमदार होते. त्यातील 4 जणांनी राजीनामा दिल्यामुळे ही संख्या आता 69 वर पोहोचली आहे. या आधी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपले 14 आमदार जयपूरला पाठवले होते. येत्या 26 मार्चला गुजरातमध्ये राज्यसभेच्या 4 जागांसाठी निवडणूक होत आहे. (हेही वाचा, Rajya Sabha Election 2020: राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राजीव सातव यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचं तिकीट?)

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अभय भारद्वाज, रामिला बारा आणि नरहरि अमीन यांना उमेदवारी दिली आहे. तर, शक्ति सिंह गोहिल आणि भरतसिंह सोलंकी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. एकूण संख्याबळ विचारात घेता भाजपच्या दोन जागा जिंकून येतील असे चित्र आहे. मात्र, पक्षापलीकडे जाऊन मतदान होण्याची शक्यता विचारात घेऊन भाजपने तिसरा उमेदवारही रिंगणात उतरवला आहे.