Rajiv Satav File Image| Photoo Credits: Facebook

महाराष्ट्रात 7 राज्यसभा जागांसाठी 26 मार्च दिवशी निवडणूक होणार आहे. दरम्यान या 7व्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद पहायला मिळाले होते. मात्र आता कॉंग्रेस पक्षाकडून हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांना उमेदवारी मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. राजीव सातव हे युवा नेतृत्त्व असून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा संख्याबळानुसार 3 जागा भाजपा, 1 जागा शिवसेना तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे प्रत्येकी एका जागेवर विजय निश्चित आहे. पण सातव्या जागेवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीला एकत्र राहणं आवश्यक आहे. Rajya Sabha Election 2020: तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांचा विचार, पहिल्या दोन जागांसाठी रामदास आठवले, उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित.  

राजीव सातव यांनी 2019 ची लोकसभा निवडणुक न लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ते राज्यसभेच्या तिकीटाद्वारा पुन्हा संसदेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहे. दरम्यान 2014 साली राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा पराभव करत खासदारपद मिळवलं होतं. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळात काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज भाजपाकडून उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाने जाहीर केलेल्या यादीनुसार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.