
समाजसुधारक राजर्षी छत्रपती साहू महाराज यांच्या 100 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड (Hervad) गावाने पतीच्या निधनानंतर तेथील स्त्रीने पाळल्या जाणार्या प्रथांवर (Funerary Practices) बंदी आणण्याचे आवाहन केले. याद्वारे विधवा प्रथेला मूठमाती देण्यात आली. असे करणारे ते राज्यातील पहिले गाव ठरले. हा ठराव मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारने सर्व गावांना त्याचे पालन करण्यास सांगितले होते. शासनाच्या निर्देशानंतर आता पुणे (Pune) जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी (Udachiwadi) या गावानेही अशा प्रथा बंदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. असे करणारे ते राज्यातील पहिले गाव ठरले आहे.
यासंदर्भातील ठराव गुरुवारी ग्रामसभेत मंजूर करण्यात आला असून, त्यानंतर काही विधवांनी कपाळावर कुंकू लावून गावात आता अशा प्रथा बंदी असल्याचे सूचित केले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी संध्याकाळी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, ‘हेरवाड आणि माणगाव या गावांनी विधवांशी संबंधित विधींवर बंदी घातली असली तरी प्रत्यक्षात उदाचीवाडी हे या प्रथांवर बंदी घालणारे आणि ही बंदी लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.’
हे एक धाडसी पाऊल असून असा आगळा वेगळा आदर्श ठेवल्याबद्दल प्रसाद यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले. विधवांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असेही ते म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गाव आणि माणगाव गावात पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, बांगड्या तोडणे यांसारख्या विधवांशी संबंधित अंत्यविधींवर बंदी घालण्यात आली. (हेही वाचा: विधवा प्रथा बंदीसाठी 'हेरवाड पॅटर्न' राज्यभर राबवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ग्रामपंचायतींना अवाहन, जिल्हा प्रशासनालाही आदेश)
याबाबत उदाचीवाडी गावात गुरूवारी सकाळी झालेल्या ग्रामसभेत 100 हून अधिक ग्रामस्थांनी सहभाग घेतला आणि त्यामध्ये अशा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गावचे सरपंच संतोष कुंभारकर म्हणाले की, ‘हा प्रस्ताव ग्रामसभेसमोर आणण्यापूर्वी आम्ही गावात जनजागृती मोहीम सुरू केली होती. यासंदर्भात कोल्हापुरात झालेला ठराव आणि शासनाच्या सूचना आम्ही ग्रामस्थांना सांगितल्या. गावातील तरुणांनी याला आक्षेप घेतला नाही, पण वडीलधारी मंडळी मात्र या निर्णयाला साथ देत नव्हती. पण नंतर, त्यांनीही हा निर्णय मान्य केला. आपण आपल्या स्त्रियांना जुन्या रूढींच्या बंधनातून मुक्त केले पाहिजे, याचा त्यांनी स्वीकार केला.’