Herwad Pattern: विधवा प्रथा बंदीसाठी  'हेरवाड पॅटर्न' राज्यभर राबवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ग्रामपंचायतींना अवाहन, जिल्हा प्रशासनालाही आदेश
CM Uddhav Thackeray | (File Photo)

बदलत्या काळानुसरुप राज्यातील विधवा प्रथा (Widowhood Practice) बंद व्हावी यासाठी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष या निर्णयाला निमित्त ठरले. हेरवाड ग्रामपंचायतीचा निर्णय आता राज्यातील महाविकासआघाडी सरकारलाही आवडला आहे. त्यामुळे हेरवाड पॅटर्न (Herwad Pattern) राज्यभर राबवावा असे अवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत. तसेच, सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

हेरवाड पॅटर्न राबविण्याबाबत राज्य सरकारने आज म्हणजेच 18 मे रोजी एक परिपत्रक काढले आहे. यात हेरवाड ग्रामपंचायतीच्या कृतीचे कौतुक करत हा उपक्रम स्तुत्य असल्याचे म्हटले आहे. आजचा समाज प्रगतीशील आणि विज्ञानवादी म्हणून वाटचाल करत असताना या प्रथेचे निर्मुलन होणेच गरजेचे होते. तेच पाऊल हेरवाड ग्रामपंचायतीने टाकले. राज्य सरकारनेही ही प्रथा बंद करण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व संबंधितांना निर्देश देण्याचे सरकारने ठरवले आहे. (हेही वाचा, विधवा महिलांना निर्माण होणार उत्पन्नाचे साधन व रोजगाराच्या संधी; शासन राबवणार वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना, जाणून घ्या कसा होणार फायदा)

विधवा प्रथेचे निर्मुलनासाठी समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात यावी यासाठी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आप आपल्या स्तरावरील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करावे तसेच ग्रामपंचायत हेरवाड जि. कोल्हापूर यांनी केलेल्या ग्रामसभा ठरावा प्रमाणेच राज्यातील सर्व ग्रामपंचायतीना ठराव घेणेबाबत प्रोत्साहीत करावे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.