Pavana River: धक्कादायक! पर्यटनासाठी गेलेल्या दोन मित्रांचा पवना नदीत बुडून मृत्यू
Drown | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

पर्यटनासाठी गेलेल्या दोन मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरातील पवना नदीत (Pavana River) सोमवारी (15 मार्च) सायंकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील दोघेही मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पंरतु, त्यांना पाण्याचा अंदाज न बांधता आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

वैभव ओव्हाळ (वय, 23) आणि बाबुराव भुसे (वय, 23) अशी मृतांची नावे आहेत. वैभव आणि बाबुराव सोमवारी दुपारी मावळा परिसरात पर्यटनासाठी मावळातील सांगवडे गावात गेले होते. दरम्यान, सांगवडे गावातून वाहणाऱ्या पवना नदीत पोहण्यासाठी हे दोघेही पाण्यात उतरले. पंरतु, त्यांना पाण्याचा अंदाज न बांधता आल्याने ते पाण्यात बुडाले. यासंदर्भात गावातील ग्रामस्थ हिरामन आगळे यांनी त्वरीत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, दिवस मावळल्याने सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले होते. त्यानंतर एनडीआरएफच्या पथकाने आज सकळी नदी पात्रात शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास वैभवचा मृतदेह सापडला. तर, कालांतराने बाबुरावचाही मृतदेह आढळून आला. हे देखील वाचा- Vasai-Virar: पोलीस कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग; वसई पूर्व भागातील घटना

आपल्या घरातील तरूण मुलांचा मृत्यू झाल्याने ओव्हाळ आणि भुसे या दोन्ही कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे. या दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने माहिती दिली आहे.