
पुण्यातील (Pune) वाहतूक कोंडी ही प्रत्येक पुणेकराची डोकेदुखी आहे, आणि विशेषतः हिंजवडीसारख्या आयटी हबला जाणाऱ्या रस्त्यांवर हा त्रास अधिकच जाणवतो. या समस्येवर तोडगा म्हणून शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो लाइन-3 (Pune Metro Line-3 Project) ची घोषणा झाली, पण या बहुप्रतीक्षित प्रकल्पाला सातत्याने उशीर होत आहे. आता 2026 पर्यंत हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होण्याची आहे. साधारण 23.3 किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग पुण्यातील आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी गेम-चेंजर ठरणार होता, पण अनेक अडथळ्यांमुळे पुणेकरांना अजून या मार्गाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आता टाटा ग्रुपच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (TUTPL) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्सच्या एका कन्सोर्टियमने, पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (PMRDA) ला पुणे मेट्रो लाईन-3 प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत मार्च 2026 पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. या प्रकल्पाला सुरुवातीला मार्च 2023 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य होते, पण ते मार्च 2025, नंतर सप्टेंबर 2025, आणि आता 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. एप्रिल 2025 पर्यंत प्रकल्प 83-85% पूर्ण झाला आहे, पण काही प्रमुख अडथळ्यांमुळे विलंब होत आहे.
मुदत वाढीबाबत पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे म्हणाले, टाटा-सीमेन्सने एक प्रस्ताव सादर केला आहे आणि मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे. त्याबाबतचा निर्णय कार्यकारी बैठकीत घेतला जाईल. त्यापूर्वी, आम्ही कामाचा आढावा घेऊ आणि त्यानुसार निर्णय घेऊ. पुणे मेट्रो लाइन-3 हा शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानचा 23.3 किलोमीटर लांबीचा उन्नत मेट्रो मार्ग आहे, ज्यामध्ये 23 स्थानके असतील. या मार्गाला ‘पुणेरी मेट्रो’ असेही म्हणतात, आणि तो पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) द्वारे सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत विकसित केला जात आहे. टाटा आणि सिमेन्स यांच्या संयुक्त उपक्रमाला हा प्रकल्प 2018 मध्ये देण्यात आला. (हेही वाचा: Mumbai Metro Line 2B: मुंबई मेट्रो लाईन 2B, मांडळे ते डायमंड गार्डनदरम्यान 5.5 किमी मार्गावर प्रायोगिक चाचण्या सुरू)
गेल्या वर्षी भूसंपादन, परवानग्या आणि निविदांमुळे झालेल्या विलंबामुळे पुढील विलंबासाठी दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला होता. यामुळे कंत्राटदाराला कामाची गती वाढविण्यास भाग पाडले गेले. बाणेर, सकलनगर, सिव्हिल कोर्ट आणि इतर 11 स्थानकांवर एस्केलेटर आणि पायाभूत सुविधांसह उर्वरित कामे पूर्णत्वाच्या जवळ आहेत. 99% जमीन अधिग्रहण पूर्ण झाले आहे, फक्त राज भवन आणि मॉडर्न कॉलेज येथील काही भाग बाकी आहे. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडेल. हिंजवडी ते शिवाजीनगर हा प्रवास केवळ 35-40 मिनिटांत शक्य होईल, आणि मेट्रोच्या आधुनिक सुविधा प्रवाशांना आरामदायी अनुभव देतील.