पुणे: गळफास लावून आत्महत्या केलेल्या महिलेच्या दोन मुलींवर बलात्कार झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट, एका आरोपीला अटक
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

पुणे (Pune) येथील एका महिलेने तिच्या 3 मुलांची हत्या करुन गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मात्र हा प्रकार घडल्यानंतर आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. यामध्ये दोन लहान मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांमधील दोन लहान मुलींवर बलात्कार झाल्याचे आता वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अद्याप पुढील तपास सुरु आहे.

महिलेने केलेली आत्महत्या आर्थिक चणचणींमुळे केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तर फातिमा भगवान असं या महिलेचं नाव असून तिने स्वतःसोबतच दोन मुली आणि एका मुलाचं देखील आयुष्य संपवलं आहे. ही घटना भोसरी येथील पिंपरी चिंचवड भागात घडली. मृत मुलं ही नऊ वर्षांपेक्षाही कमी वयाची आहेत. तिन्ही मुलं एका खोलीत मृतावस्थेत आढळली आहेत.(पुणे: पोटच्या 3 मुलांची हत्या करून आईने केली गळफास घेऊन आत्महत्या)

तर फातिमा हिने दुसर्‍या खोलीत गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. फातिमाचा पती हा फळ विक्रेता असून तो घरी परतल्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस आला आहे.फातिमा आणि तिचा पती सतत आर्थिक चणचणीच्या कारणावरून भांडत होते तर ते नुकतेच पुण्यात भाड्याच्या घरात राहण्यास आले होते.