प्रतिकात्मक फोटो (संग्रहित संपादित प्रतिमा)

पुणे (Pune) जिल्ह्यातील मावळ (Maval Gram Panchyat Election) तालुक्यामधील टाकवे गावात 16 फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड केली जाणार आहे. मात्र, त्याआधी या टाकवे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, मावळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच आणि उपसरपंच या पदासाठी सदस्यांच्या नावाने जादूटोणा होत असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून समाजात अंधश्रद्धा पसरविणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले आणि त्यांचे चुलते भूषण असवले यांच्यासह त्यांचे सहकारी ऋषिनाथ शिंदे यांचे नावे लिंबावर लिहून पिपळाच्या झाडाला खिळा मारून ठोकले होते. याची माहिती होताच अविनाश असवले यांनी घटनास्थळी जाऊन त्यानंतर पाहणी केली. हा जादूटोणा किंवा नरबळीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वडगाव पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात टीव्ही9ने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- 'वैभववाडीत भाजपाचे 7 नगरसेवक शिवसेनेमध्ये' हे आमचं उद्धव ठाकरे यांना व्हॅलेंटाईन डे गिफ्ट; नितेश राणे यांची खोचक प्रतिक्रिया

महत्वाचे म्हणजे, मावळ तालुक्यात अशी घटना पहिल्यांदाच घडली नसून याआधीही तुंग येथील एका झाडाला नऊ व्यक्तींचे फोटो लावून भनामती केल्याचा प्रकार समोर आला होता. हा प्रकार 2019 मध्ये डिसेंबर महिन्यात घडला होता. त्यावेळी तुंगसह चाफेसर, महागाव, आतवण, पानसोली या वेगवेगळ्या गावांतील प्रमुख व्यक्तींचे फोटो शोधून ते या ठिकाणी लावले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण गावात एकच खळबळ माजली होती.