पुणे: पार्किंगचा वाद विकोपाला गेला; कानाचा चावा घेऊन लचकाच तोडला; पिंपरी-चिंचवड येथील घटना
Ear| Image only representative purpose (Photo credit: pxhere)

पुणे: पार्किंगच्या वादातून झालेल्या भांडणात एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्याच्या कानाचा कडकडून चावा घेतला आणि कानाचा लचकाही तोडला. ही घटना पिंपरी चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील उपनगर निगडी (Nigdi) परिसरातील यमुनानगर (Yamunanagar) येथे घडली. पीडित शेजाऱ्याने आरोपीविरोधात निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. निगडी पोलिसांनी कौस्तुभ महेंद्र गोळे (वय २६, रा. यमुनानगर, निगडी) यांनी दिलल्या फिर्यादीवरुन अभिजित गुंजाळ (रा. यमुनानगर, निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार कौस्तुभ गोळे आणि आरोपी अभिजित गुंजाळ हे दोघे एकमेकांचे शेजारी आहेत. दोघेही वाहनधारक असून, कौस्तुभ यांच्याकडे दुचाकी तर अभिजित यांच्याकडे चारचाकी गाडी आहे. दोघेही सोसाटीच्या पार्किंगमध्ये गाडी उभी करतात. दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही काळापासून वाद आहेत. दरम्यान, घटना घडली त्या दिवशी कौस्तुभ यांची दुचाकी सोसायटीच्या पार्किंमध्ये उभी होती. तर अभिजित या दुचाकीसोबत काहीतर खोडसाळपणा करत असल्याचे कौस्तुभ यांच्या पत्नीने पाहिले व त्याबाबत पती कौस्तुभ यांना माहिती दिली.

पत्नीने दिलेल्या माहितीवरुन कौस्तुभ अभिजित यांच्याकडे जाब विचारला. जाब विचारल्याचा राग आल्याने अभिजित याने जोराची लाथ मारुन कौस्तुभ यांची दुचाकी खाली पाडली. तसेच, तुझ्या दुचाकीमुळे माझी कार पार्किंग करण्यास अडचण येते असा आरोपही केला. दोघांमध्ये सुरुवातीला बाचाबाची सुरु झाली. (हेही वाचा, महिलेच्या कानातून डॉक्टरांनी काढली जिवंत पाल; सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का)

दरम्यान, अभिजित याने कौस्तुभ आणि त्यांच्या पत्नीस अभिजित याने लोखंडी जाड वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीचा विरोध करत असताना आरोपी अभिजित याने कौस्तुभ यांच्या कानाला चावा घेतला. या चाव्यात कौस्तुभ यांच्या कानाचा लचका तुटला. या घटनेनंतर कौस्तुभ यांनी निगडी पोलीस स्थानक गाठून अभिजित याच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु केला आहे.