Pune Ganesh Utsav 2022  Guidelines Update: पुण्यात शेवटचे 5  दिवस लाऊड स्पीकरला मध्यरात्रीपर्यंत परवानगी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
CM Shinde | PC: Twitter

कोरोना संकटानंतर आता यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सव (Ganesh Utsav) मोठ्या आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जाणार आहे. ऑगस्ट महिना अखेरीस गणरायाचं स्वागत होणार आहे त्यामुळे आता तयारीला वेग आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी असलेली उत्सुकता पाहता काल पुणे दौर्‍यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी गणेशोत्सवात शेवटचे 5 दिवस लाऊड स्पीकरला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत परवानगी दिली जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. सोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप घालण्यासाठी देखील आता 5 वर्षांसाठी एकत्र परवानगी दिली जाणार आहे. ही परवानगी सिंगल विंडो सिस्टम द्वारा दिली जाणार आहे.

सध्याच्या नियमांनुसार, मंडळांना परवानगी घेण्यासाठी दरवर्षी अर्ज करावा लागत आहे. काल पुण्यात मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांसोबत बसून चर्चा केली. यावेळी अमिताभ गुप्ता, पुणे पोलिस कमिशनर देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी सहा दिवसांसाठी लाऊड स्पीकरला परवानगी, 5 वर्षांसाठी मंडपाला परवानगी, मंडपाजवळ फेरीवाल्यांना परवानगी अशा विविध मागण्या मांडल्या होत्या. हे देखील नक्की वाचा: Pune Ganeshotsav 2022 Regulations: यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी जारी केली मंडळांसाठी नियमावली, घ्या जाणून .

एकनाथ शिंदेंनी माहिती देताना, " मंडळ पाच दिवस लाऊड स्पीकर वापरू शकतात तसेच गणेश विसर्जनाच्या वेळेसही लाऊड स्पीकर वापरू शकतात असे म्हणाले आहेत. जिल्हाधिकार्‍यांना यावेळी परवानगी वाढवून देण्यासाठी फाईल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मंडपाच्या 5 वर्षांच्या उभारणीसाठी पुणे पोलिस, पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दल यांनाही आदेश देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विविध परवानग्यांसाठी आवश्यक शुल्क देखील रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मंडळांनी देखील बुस्टर डोस घेण्यासाठी भाविकांना उत्तेजित करावं असं म्हटलं आहे.

दरम्यान यंदा 31 ऑगस्ट दिवशी गणपतीचं आगमन होणार आहे आणि 9 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी दिवशी 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन केले जाणार आहे. पुण्यात मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जनानंतर उर्वरित गणेश मंडळांच्या मूर्तीच्या मिरवणुका आणि विसर्जन सोहळा होतो.