पुणे: बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल
Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay)

पुणे(Pune) येथील बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीवरील (Pancard Club Building) डोमला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहे. या घटनेत संपूर्ण डोम जळून खाक झाला आहे. जवळपास 40 ते 50 फूट उंच इमारतीच्यावरील या डोमला अचानक आग लागली आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या इमारतीत फायबरचे सामान असल्याने आघ मोठ्या प्रमाणात पसरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ही आग कशामुळे आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही

पुणे येथील बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लबची ही इमारत सर्वात मोठी इमारत आहे. या इमारतीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात पॅनकार्डचा व्यवहार केला जातो. मात्र, ही इमारत गेल्या काही दिवसांपासून बंद होती. तसेच या इमारतीत कुठलेही काम सुरु नव्हते. महत्वाचे म्हणजे ही इमारत पूर्णपणे रिकामी होती. यामुळे कोणतीही जीवीतहानी होणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण काय? असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. (हे देखील वाचा-जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ला 26/11 च्या घटनेची आठवण करुन देणारा: उद्धव ठाकरे)

पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला आग लागल्याची माहीती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी चारही बाजूने या इमारतीला घेरले असून अग्निशमन दलाचे जवान ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयन्त करत आहेत. मात्र, आग खूप मोठी असल्याने त्यावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलेले नाही.