
महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्हा न्यायालयाने (District Courts) अलिकडेच केलेल्या एका विधानामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. पतीपासून घटस्फोट मागण्यासाठी ती जिल्हा न्यायालयात गेली. यावेळी न्यायाधीश दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करत होते. मात्र यावेळी न्यायाधीशांनी महिलेबाबत कथितपणे केलेली टिप्पणी चर्चेचा विषय ठरत आहे. न्यायाधीशांनी महिलेला म्हटले की, ‘तू कपाळावर टिकली लावत नाहीस, गळ्यात मंगळसूत्रही घालत नाहीस, जर तू विवाहित महिलेसारखी राहिली नाहीस, तर तुझा नवरा तुझ्यामध्ये का रस घेईल?’
लिंक्डइनवर अंकुर आर. जहागीरदार यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नमूद केले की, हे जोडपे काही काळापूर्वी वेगळे झाले होते आणि न्यायाधीश त्यांना त्यांचा वाद सौहार्दपूर्ण पद्धतीने सोडवण्यास प्रोत्साहित करत होते. मात्र, न्यायाधीशांनी महिलेने मंगळसूत्र न घालणे, तसेच टिकली न लावणे यावर प्रश्न उपस्थित केले. आता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आणखी एक घटना नमूद करताना जहागीरदार लिहितात, एकदा न्यायाधीश म्हणाले होते, ‘जर एखादी महिला चांगली कमाई करत असेल, तर ती नेहमीच तिच्यापेक्षा जास्त कमाई करणारा नवरा शोधेल आणि कमी कमाई करणाऱ्यावर कधीही समाधान मानणार नाही. मात्र, जर चांगला कमाई करणारा पुरूष लग्न करू इच्छित असेल, तर तो घरात भांडी घासणाऱ्या मोलकरणीशीही लग्न करू शकतो. पुरुष किती लवचिक असतात ते पहा. तुम्हीही थोडी लवचिकता दाखवली पाहिजे. इतके कठोर होऊ नका.’ (हेही वाचा: Sangli Shocker: एक कोटी रुपयांच्या विम्याचे पैसे मिळविण्यासाठी पत्नीने मुलासह केली पतीची हत्या; पोलिसांकडून अटक)
जहागीरदार पुढे म्हणाले की, त्यांना या टिप्पण्या आवडल्या नाहीत. मात्र न्यायाधीशांनी केलेल्या अशा बेताल टिप्पण्यांबद्दल आवाज उठवण्याचा पर्याय नव्हता. ते म्हणतात, या घटना हिमनगाचे केवळ टोक असू शकते. जिल्हा न्यायालयांमध्ये असे बरेच काही घडते, ज्यामुळे कोणत्याही तर्कशुद्ध विचारसरणीच्या सुशिक्षित व्यक्तीच्या विवेकाला धक्का पोहोचेल. दुर्दैवाने, मला वाटते की, आपल्या समाजात काही अपमानजनक गोष्टींसाठी मूलभूत सहिष्णुता आहे. पितृसत्ता क्लबचा पहिला नियम म्हणजे तुम्ही पितृसत्ता क्लबबद्दल बोलू नका.’