
महाराष्ट्रातील सांगली (Sangli) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीला आत्महत्या करण्यास भाग पाडले, पण जेव्हा तो यासाठी तयार झाला नाही, तेव्हा तिने तिचा मुलगा आणि त्याच्या एका मित्रासह पतीची हत्या केली. यानंतर आरोपींनी घटनेला अपघात म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी पहाटे मिरज-पंढरपूर महामार्गावरील लांडेवाडीजवळ घडली. मात्र, पोलिसांनी तपासानंतर आरोपी आई-मुलाला आणि त्याच्या मित्राला अटक केली. पोलीस चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्यासाठी दिलेले कारण आणखी धक्कादायक आहे.
आरोपी महिलेने सांगितले की, तिचा नवरा कर्जात बुडाला होता. त्याच्यावर एकूण 50 लाख रुपयांचे कर्ज होते आणि त्या दबावामुळे ती आधीच त्रस्त होती. तिच्या पतीने 1 कोटी रुपयांचा विमा काढला असल्याने, त्यांनी प्रथम पतीला आत्महत्या करण्यास सांगितले. जेव्हा त्याने नकार दिला, तेव्हा त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले. त्यानंतरही तो राजी झाला नाही, तेव्हा पत्नीने त्याला मारण्याचा आणि विम्याचे पैसे हडपण्याचा कट रचला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेचे नाव वनिता बाबुराव पाटील असे आहे. दुसरा आरोपी मुलगा तेजस आणि तिसरा तेजसचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान आहे. या तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले, जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, मृत बाबुराव पाटील यांचा मृतदेह हॉटेल आर्याजवळ आढळला. त्यानंतर त्यांचा भाऊ सागर पाटील यांनी त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेले, जिथे सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते आणि एडीआर दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: Mumbai Shocker: धक्कादायक! 13 वर्षांच्या मुलाकडून सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या, इतर दोन घटनांमध्येही लहान मुलांचे बळी)
परंतु आई आणि मुलाच्या जबाबावरून पोलिसांना संशय आला. या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक देखरेखीमुळे खूप मदत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक चौकशीमध्ये घटनेच्या वेळी आरोपींनी ते कराडमध्ये असल्याचे सांगितले होते. मात्र नंतर त्यांचे स्थान गुन्ह्याच्या ठिकाणीच असल्याचे उघड झाले. तसेच सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. यामध्ये संपूर्ण घटना उघडकीस आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.