Deenanath Mangeshkar Hospital

रुग्णालयाने प्रवेश नाकारल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यातून (Pune) समोर आली आहे. 10 लाख रुपयांची आगाऊ रक्कम न भरल्यामुळे शहरातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने (Deenanath Mangeshkar Hospital) iकथितरित्या प्रवेश नाकारल्यानंतर तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाला. या कथित मृत्यूच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात टीका होत असून, अनेक संघटना रुग्णालयाच्या गेटसमोर निदर्शने करत आहेत. यावेळी रुग्णालयाबाहेर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते व यावेळी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकण्यात आली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी परिसरातील वातावरण खूपच तापले होते. यानंतर दोन्ही गटांनी रुग्णालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखले. भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी गुरुवारी दावा केला की, पुण्यातील एका रुग्णालयाने त्यांच्या वैयक्तिक सचिवाच्या गर्भवती पत्नीला 10 लाख रुपयांची आगाऊ रक्कम न भरल्यामुळे दाखल करण्यास नकार दिला. त्यांनतर तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांनी जुळ्या मुलांना जन्म व त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती सुशांत हे गोरखे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात.

गोरखे यांनी आरोप केला की, तात्काळ 3 लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊनही, रुग्णालयाने रुग्णाला दाखल करण्यास नकार दिला. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, त्यांनी 3 लाख रुपये तात्काळ देण्याची तयारी दर्शवली आणि उरलेली रक्कम लवकरच जमा करण्याचे आश्वासन दिले, पण रुग्णालयाने जोपर्यंत संपूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आपातकालीन शस्त्रक्रिया सुरू करण्यास नकार दिला. त्यानंतर मंत्रालयाकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करण्यात आला, परंतु रुग्णालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. हा एक गंभीर मुद्दा आहे. मी मुख्यमंत्र्यांना रुग्णालयाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती करतो. मी हा मुद्दा येत्या विधिमंडळ अधिवेशनातही उपस्थित करेन, असे गोरखे म्हणाले. (हेही वाचा: दीनानाथ मंगेशकर रूग्णालय मुख्यमंत्री कार्यालयाला जुमानत नसतील तर इतरांच काय घेऊन बसलात? पुण्याच्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचे X पोस्ट शेअर करत आरोप)

परंतु रुग्णालयाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि महिलेच्या नातेवाईकांनी ‘दिशाभूल करणारी माहिती’ दिल्याचा आरोप केला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाशराव अबिटकर यांनी या घटनेला ‘मन सुन्न करणारी’ म्हटले आणि कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. राज्य महिला आयोगानेही पुणे महानगरपालिका आयुक्तांना तपासाचे आदेश दिले आहेत, तर आरोग्य विभागाने रुग्णालयाचे ऑडिट करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही घटना खाजगी रुग्णालयांच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उभे करते. या प्रकरणाची राज्य सरकारनेही दाखल घेतली असून, सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली.

राज्य सरकारचे चौकशीचे आदेश:

पवार म्हणाले, 'पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनानं त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं, ही विनंती.'

संतप्त निदर्शकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कर्मचाऱ्यांवर फेकली चिल्लर: 

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले, आम्ही या घटनेचा सविस्तर अहवाल तयार करू आणि तो राज्याच्या आरोग्य विभागाला सादर करू. या अहवालात मृत महिलेच्या कुटुंबाने उघड न केलेल्या प्रकरणाबद्दल सर्वसमावेशक वैद्यकीय तपशीलांचा समावेश असेल. तनिषा यांच्या मृत्यूने पुण्यातील नागरिकांमध्ये विश्वासाला तडा गेला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, जे स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने ओळखले जाते आणि गरीबांसाठी असल्याचा दावा करते, त्याच्यावर आता पैशांसाठी जीवाशी खेळल्याचा आरोप आहे. कुटुंबीयांचा दावा आहे की, जर वेळेत उपचार मिळाले असते, तर तनिषा वाचल्या असत्या. आता सर्वांचे डोळे चौकशीच्या अहवालाकडे लागले आहेत.