पुणे: शिवभोजन योजनेला 3 दिवसांत उत्स्फूर्त प्रतिसाद; गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रधारी पोलीस तैनात
Shiv Bhojan Yojana (PC- PTI Wikimedia Commons)

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवभोजन योजनेची (Shiv Bhojan Yojana) घोषणा केली होती. त्यानंतर गेल्या महिन्याच्या अखेरीस मंत्रिमंडळाने शिवभोजन योजनेला मान्यता दिली होती. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर 26 जानेवारीपासून या योजेनेला सुरवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड शहरात मिळून 11 ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली होती. शिवभोजन योजनेची सुरुवात होऊन केवळ तीनच दिवस उलटले असून पुण्यात शिवभोजन थाळी योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी मोठी रांग लागत आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पुणे महानगरपालिकेत शिवभोजन थाळीचे उद्घाटन करण्यात आले होते. पुण्यात शिवभोजन थाळीचे 7 केंद्र असून सर्वच केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. शिवभोजन थाळीसाठी नागरिकांच्या मोठी रांग लागत आहे. मार्केट यार्डमध्ये तर चक्क पोलीस बंदोबस्तात शिवभोजन थाळी सुरु आहे. गर्दी नियंत्रणात राहावी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी दोन शस्त्रधारी पोलीस रांगेवर नियंत्रण ठेवत असतात. शिवभोजन थाळीत 30 ग्रॅमच्या 2 चपात्या, 100 ग्रॅमची एक वाटी भाजी, 150 ग्रॅमचा एक मूद भात व 100 ग्रॅमचे एक वाटी वरण समाविष्ट आहे. हे देखील वाचा- छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक येथील शिवभोजन कार्यलयाचे उद्घाटन

या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागणारआहे. त्यासाठी शासनाकडून 'महा अन्नपूर्णा' हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक केंद्रात रोज किमान 75 आणि कमाल 150 जणांनाच या योजनेअंतर्गत जेवण देण्यात येत आहे. रोज दुपारी 12 ते 2 या वेळेतच ही योजना कार्यान्वित राहणार असून एका व्यक्तीला एकच थाळी मिळणार आहे.