महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे (Pune) शहरात महिला बेपत्ता (Missing Women) झाल्याची एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार, 2022 च्या पहिल्या सात महिन्यांत पुण्यातून एकूण 840 महिला बेपत्ता झाल्या होत्या. मात्र दिलासादायक बाब म्हणजे त्यातील सुमारे 396 महिला सापडल्या आहेत. शहर पोलिसांनी शेअर केलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये पुण्यातून बेपत्ता झालेल्या एकूण 840 महिलांपैकी जूनमध्ये सर्वाधिक (186) महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून त्यानंतर मे (135) महिला बेपत्ता झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा विचार करता, याठिकाणी 885 महिला बेपत्ता झाल्या, तर पुणे ग्रामीण पोलिसांनी याच कालावधीत 743 महिला बेपत्ता झाल्याची नोंद केली. यातील बहुतेक महिला कौटुंबिक कलह, नातेसंबंध किंवा नोकरीच्या संधींमुळे घर सोडतात. मात्र अनेकजणी आपली चूक लक्षात घेऊन परतही येतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 16 ते 25 वर्षे वयोगटातील बहुसंख्य स्त्रिया अफेअर्स, घरगुती भांडण किंवा पालकांसोबत घरातील भांडणामुळे घर सोडतात, असेही पोलिसांनी सांगितले.
या बेपत्ता महिलांमध्ये मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या किंवा रस्त्यावर राहणाऱ्यांचाही समावेश असू शकतो. सामाजिक कार्यकर्ते मात्र या हरवलेल्या केसेस मानवी तस्करीपासून वेगळे करता येणार नाहीत यावर भर देतात. मात्र त्यामागे विशेष कारण नसल्याची माहिती पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा कक्षाचे पोलीस निरीक्षक अण्णा माने यांनी दिली. यातील प्रत्येक मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे माने यांनी सांगितले. पोलिसांनी असेही सांगितले की अशा काही महिला आहेत ज्यांना स्वतंत्र जीवन जगायचे आहे आणि त्यामुळे आपल्या सनातनी घरातून त्या पळून जातात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार महिलांचे अपहरण झाल्याची काही प्रकरणे आहेत.
महिला आणि बाल कार्यकर्त्या यामिनी अदाबे म्हणाल्या की, महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असली तरी मानवी तस्करीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी गेल्या दोन वर्षांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. याबाबत गोर्हे यांनी माजी गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. (हेही वाचा: Pune: पोलीस भासवणाऱ्या पुरुषांनी ज्येष्ठ नागरिकाचे 1.35 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास)
गोर्हे यांनी सांगितले की, पोलिसांनी ‘मुस्कान योजने’अंतर्गत या महिलांचा शोध सुरू केला असून हरवलेल्या प्रकरणामागील सर्व बाजू शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिलांची सुटका केल्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशनही सुरू करावे, असे त्या म्हणाल्या. गोर्हे यांनी पुढे सुचवले की, पोलिसांनी मृत झालेल्या अनोळखी महिलांचे छायाचित्र प्रदर्शन भरवावे. जेणेकरून त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या पालकांना मिळू शकेल.