
Nagpur Crime News: नागपुरात एका डॉक्टरने भावाच्या मदतीने आपल्या पत्नीची हत्या (Murder) केली आहे. नागपूर पोलिसांनी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्येचा गुन्हा उलगडला आहे. अर्चना यांचे पती आणि दीराने त्यांची निर्घृण हत्या केली. सुरुवातीला दरोड्याचे वर्णन सांगितलेल्या या घटनेत खोलवर रुजलेले घरगुती कलह आणि पूर्वनियोजित हिंसाचार उघडकीस आला आहे. डॉ अनिल राहुले (52 वर्ष) यांनी भाऊ राजू (59 वर्ष) अशी आरोपींची नावे आहेत.
या दोन्ही आरोपींनी सोबत मिळून कट रचून अर्चना राहुले यांची हत्या केली. डॉ अनिल यांनी भावाच्या मदतीने रॉडने वार करून डॉक्टर पत्नीचा खून केला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाडीकर लेआऊट येथे ही घटना घडली. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी दोघा भावांना अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, डॉ. अर्चना या नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपि विभागात साहाय्यक प्राध्यापक होत्या. तर त्यांचे पती अनिल छत्तीसगड येथील रायपूर येथे मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये प्राध्यापक आहे. (हेही वाचा - Meerut Saurabh Murder Case: सौरभ हत्याकांड प्रकरणात मुस्कानला शिक्षेतून सूट मिळेल का? गर्भवती महिलांसाठी काय आहेत नियम? जाणून घ्या)
राहुले दाम्पत्याला एक मुलगा असून तो तेलंगणा येथे एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉ अनिल अर्चनावर चारित्र्यावरून संशय घेत असे. यावरून अर्चना आणि अनिल यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. वादविवादात अनिल यांनी पत्नीवर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख मर्डर केसमध्ये Ujjwal Nikam यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, डॉ. अनिल यांनी त्यांचा भाऊ राजू राहुले यांच्यासोबत मिळून अर्चनाची हत्या करण्याचा कट रचला होता. 9 एप्रिल रोजी राजू यांना त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी बोलावण्यात आले. अनिल यांनी त्यांच्या पत्नीचे पाय धरले असताना, राजूने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले. त्यानंतर दोघांनी सेंट्रल लॉकिंग सिस्टमचा वापर करून घराला कुलूप लावले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
डॉ. अनिल तीन दिवसांनंतर परतले आणि त्यांनी अलार्म वाजवून दरोड्यातून हत्या झाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चौकशीदरम्यान बेशुद्ध होण्याचे नाटक करणे यासह त्यांच्या संशयास्पद वर्तनाने पोलिसांचे लक्ष वेधले. चौकशीदरम्यान, डॉ. अनिल यांनी गुन्ह्याची कबुली दिली, ज्यामुळे त्यांना आणि त्यांच्या भावाला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी काही व्यक्तींचा सहभाग होता का? याचा तपास आता अधिकारी करत आहेत.