Pooja Chavan (Photo Credit: Instagram)

Pooja Chavan Suicide Case: सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण (Pooja Chavan) च्या आत्महत्येसंदर्भात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पूजाच्या आत्महत्येनंतर तिच्या आई-वडिलांनी यासंदर्भात कोणतीही तक्रार केली नव्हती. आता पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुणे लष्कर कोर्टात पहिला खटला दाखल करण्यात आला आहे. येत्या 5 मार्चला या खटल्याची सुनावणी होणार आहे. लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अॅड. विजयसिंह ठोंबरे (Ad. Vijay Thombre) यांनी यासंदर्भात खटला दाखल केला आहे. ठोंबरे यांनी याआधी पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, पूजाच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल न झाल्याने ठोंबरे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर भाजपने शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. संजय राठोड यांची या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील विरोधी पक्षाकडून होत आहे. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप खासदार गिरीश बापट यांची सून आणि भाजप पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी गुरुवारी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. (वाचा - Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड अधिवेशनात मंत्रीच असणार की विकेट पडणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष)

दरम्यान, पूजाची बदनामी थांबवा नाहीतर कुटुंबासह आम्हाला आत्महत्या करावी, अशी प्रतिक्रिया पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. यावेळी पूजाचे वडील म्हणाले, रोज वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप, फोटोग्राफ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे पूजाची बदनामी होत आहे. पूजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र, कृपया तिची बदनामी थांबवा. पूजाच्या मृत्यूवरून राजकारण करणं थांबवा, असंही लहु चव्हाण यांनी म्हटलं आहे.

पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर पूजाच्या आत्महत्येसंदर्भातील अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. भाजप नेत्यांनी या प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला होता. सध्या सोशल मीडियावर आणखी एक नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात गरुड शेठ नावाची व्यक्ती आणि पूजा यांचा संवाद ऐकायला मिळत आहे.