Sanjay Rathore | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) नाव आल्यानंतर जोरदार चर्चेत असलेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गेले प्रदीर्घ काळ गायब असलेले राठोड वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर परतले. पोहरादेवी येथे त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. येते त्यांच्या स्वागताला हजारो समर्थक उपस्थित झाले. त्यामुळे कोरोना व्हायरस संकट काळात सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला. या सर्व प्रकारावरुन संजय राठोड पुन्हा एकदा चर्चेत आले. या प्रकारावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नाराज असल्याचे समजते.

दरम्यान, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislature Winter Session 2021) येत्या एक मार्चपासून सुरु होत आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधी पक्ष आक्रमक आहे. दुसऱ्या बाजूला महाविकासआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी राठोड यांच्या राजीनाम्याबाबत विशेष प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतू, पोहरादेवी येथे जमवलेल्या गर्दी प्रकरणी राठोड यांच्याबाबत या पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राठोड हे राज्य विधिमंडळ अधिवेशनात मंत्री म्हणूनच उपस्थित असणार की, त्यांचा राजीनामा घेतला जाणार याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना चपलेने झोडले पाहिजे; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा घणाघात)

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची नुकतीच भेट झाली. या भेटीत संजय राठोड यांनी जमविलेल्या गर्दी मुळे शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीस संजय राठोड उपस्थित होते. तसेच, पोहरादेवी येथेही बोलताना आपण पुन्हा एकदा जोमाने कॅबिनेटचे काम सुरु करणार असल्याचे संजय राठोड यांनी म्हटले होते.