PMPML BUS

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने प्रवाशांच्या खिशाला झळ बसवणारा निर्णय घेतला आहे. पीएमपीएमएलने आपल्या दैनंदिन आणि मासिक बस पासच्या किमतीत तब्बल 60 टक्क्यांनी वाढ केली आहे. नव्या दर संरचनेनुसार, दैनंदिन पासची किंमत 40 रुपये वरून 70 रुपये झाली आहे, तर मासिक पासची किंमत 900 रुपये वरून 1,500 रुपये इतकी झाली आहे. ही दरवाढ 15 मे 2025 पासून लागू होणार आहे. मात्र, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठीच्या पासच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पीएमपीएमएलने आपल्या तिकीट आणि पासच्या दरांमध्ये सुधारणा करताना नवीन संरचना लागू केली आहे. यानुसार, दैनंदिन पास, जो यापूर्वी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत 40 रुपये आणि दोन्ही हद्दींसाठी 50 रुपये होता, आता सर्व मार्गांसाठी 70 रुपये असेल. त्याचप्रमाणे, मासिक पासची किंमत, जी पुणे किंवा पिंपरी-चिंचवड हद्दीत 900 रुपये आणि दोन्ही हद्दींसाठी 1,200 रुपये होती, ती आता 1,500 रुपये इतकी असेल. पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) हद्दीतील दैनंदिन पासची किंमत 120 रुपये आणि मासिक पासची किंमत 2,700 रुपये इतकी कायम आहे.

याशिवाय, पीएमपीएमएलने तिकीट दर संरचनेतही बदल केले आहेत. यापूर्वी 2 किलोमीटर अंतरावर आधारित 40 टप्प्यांची प्रणाली होती, ती आता 11 टप्प्यांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. यामध्ये 1 ते 30 किलोमीटर अंतरासाठी 5 किलोमीटर अंतराच्या 6 टप्प्यांचा आणि 30 ते 80 किलोमीटर अंतरासाठी 10 किलोमीटर अंतराच्या 5 टप्प्यांचा समावेश आहे. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ मुंडे यांनी सांगितले की, ही नवीन दर संरचना पुणे मेट्रोशी एकीकरण सुलभ करेल, तिकीट दराची अचूक गणना सुनिश्चित करेल आणि ई-तिकीट आणि राष्ट्रीय सामाईक गतिशीलता कार्ड प्रणालीशी संरेखित होईल. (हेही वाचा: Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार)

पीएमपीएमएलने ही दरवाढ लागू करण्यामागे आर्थिक तोटा आणि ऑपरेशनल खर्चात वाढ हे प्रमुख कारण आहे. पीएमपीएमएलचा 2023-24 मधील ऑपरेशनल तोटा 706 कोटी रुपये इतका आहे, आणि गेल्या दशकात हा तोटा सातत्याने वाढत आहे. पीएमपीएमएलच्या 2,100 बसगाड्यांपैकी 450 बसगाड्या सदोष किंवा इतर कारणांमुळे बंद आहेत, ज्यामुळे रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. अहवालानुसार, पीएमपीएमएलचे वार्षिक खर्च 1,400 कोटी रुपये असून, उत्पन्न केवळ 700 ते 725 कोटी रुपये आहे.