पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भाजपचा महाजनादेश यात्रा समारोप; कार्यक्रमावर पावसाचे सावट
PM Narendra Modi | (Photo Credits: PMO)

Maharashtra Assembly Elections 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (गुरुवार 19 सप्टेंबर) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. आजच्या दौऱ्यात ते प्रामुख्याने महाराष्ट्र भाजप (BJP) आयोजित महाजनादेश यात्रा (Maha Janadesh Yatra) समारोप कार्यक्रमास नाशिक (Nashik) येथे उपस्थितीत लावतील. विधानसभा निवडणूक 2019 डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या महाजनादेश यात्रा काढली होती. आज या यात्रेचा समारोप होत आहे. जनादेश यात्रेच्या समारोपाच्या माध्यमातूनच भाजप आपल्या विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. मात्र, या सभेवर पावसाचे सावट असल्याने कार्यक्रम पार पडण्यास निसर्ग साथ देतो का याबाबत उत्सुकता आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अद्याप विधानसभा निवडणुकीची घोषणा केली नाही. मात्र, ही घोषणा केव्हाही होऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने कामाला लागले आहेत.

पंतप्रधान मोदी उपस्थिती लावणार असलेल्या नाशिक येथील तपोवन परिसरात मोठी सुरक्ष यंत्रणा आणि फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बुधवारपासूनच या परिसरात एनएसजी कमांडो दाखल झाले असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. महाजनादेश यात्रा नाशिक शहरात बुधवारी सायंकाळी दाखल झाली. या यात्रेचे भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागतही केले.

दरम्यान,  विधानसभा निवडणूक प्रचाराचे बिगूल भाजप नाशिक शहरातूनच फुंगणार हे आता जवळपास नक्की झाले आहे. त्यामुळे नाशिक शहर आणि राज्याच्या विकासासाठी पंतप्रधाम मोदी आज कोणती मोठी घोषणा करतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दुष्काळ, शेतकरी आणि पूरग्रस्तांसाठी भरीव मदत देण्याची घोषणा आजच्या सभेत केली जाण्याची शक्यता भाजपच्या गोटातून वर्तवली जात आहे. (हेही वाचा, नरेंद्र मोदी यांना 'Father Of The Country' संबोधत अमृता फडणवीस यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया)

महाजनादेश यात्रेच्या सांगतेला कोण राहणार उपस्थित?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप राज्य प्रभारी सरोज पांडे, समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ आणि खासदार, आमदार सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अनेक दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याने नाशिक शहराला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे. सभेसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलीसांनी शहरातील वाहतूक मार्गातही मोठा बदल केला आहे.