जगंलात भटकत असताना वाट चुकून पुणे (Pune) शहरात आलेला गवा (Indian Bison) मानवी कृत्यामुळे हे जग सोडून गेला. गव्याच्या मृत्यूमुळे प्राणीमित्रांतून अत्यंत दु:ख व्यक्त होत आहे. पुणे येथील 'भारत ध्वज फाउंडेशन' ( Bharat Flag Foundation) नावाच्या एका एनजीओ (NGO ) ने या गव्याची प्रतिकृती साकारली आहे. या प्रतिकृतीखाली 'आम्हाला माफ कर. आम्ही दोषी आहोत' असे लिहून गव्याची माफीही मागितली आहे.
पुणे शहरातील प्रसिद्ध ध्वज दुकानदार मुरुडकर झेंडेवाले यांच्याद्वारे ही एनजीओ चालवली जाते. कोथरुड परिसरातील महात्मा सोसायटीत एक गवा ( Gaur, Indian bison) वाट चुकून आला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने या गव्याला पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर तासभर चाललेल्या पकडापकडीनंतर गव्याला पकडण्यात यश आले. या वेळी गव्याला दोन इंजेक्शन देण्यात आली होती.
दरम्यान, पकडलेल्या या गव्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गव्याला कसे पकडतात हे पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. गर्दीला पाहून गवा बिथरला. तो वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावू लागला. अखेर त्याला पकडण्यात यश आले. परंतू, नागरी वसाहतींचा अनुभव नसल्याने गवा मोठ्या प्रमाणावर जखमी झाला. त्याच्या शरीरातून अनेक ठिकाणांहून रक्त आले. अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Wild Animal Gava Entered In Pune: पुणे शहरात गवा घुसला, वनविभागाने जाळी टाकून जेरबंद केला; बघ्यांनी केली गर्दी)
वन विभागने गव्याच्या मृत्यूला उपस्थित गर्दीला जबाबदार धरले आहे. वन विभागाने म्हटले आहे की, गर्दीमुळे घाबरलेल्या गव्याच्या शरीराचे तापमान वाढले. त्याचा रक्तदाबही वाढला त्यातून त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, मुरुडकर झेंडेवाले दुकानाचे मालक गिरीश मुरुडकर यांनी म्हटले आह की, आम्ही गव्यासोबत कसे वागलो याची आठवण करुन देण्यासाठी आम्ही गव्याची प्रतिक्रिती साकारली आहे. गव्याच्या मृत्यूबद्दल आपण जबाबदार आहोत अशी दिलगीरीची भावना पुणेकरांच्या मनात निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचेही मुरुडकर म्हणाले.