Wild Animal Gava | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जंगलात भटकत असताना एक गवा (Wild Animal Gava) वाट चुकला आणि तो चक्क पुणे शहरात दाखल झाला. पुणे शहरातील महात्मा सोसायटीत या गव्याने (Gava) दर्शन दिले आणि नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या गव्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे ( Forest department) एक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने गव्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता सुरु झाली पकडापकडी. अखेर एक तासभर उलटून गेल्यानंतर वन विभागाने गव्याला दोन इंजेक्शन दिली आणि जाळी टाकून त्याला पकडले. या वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

वन विभागाने सुरुवातीला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने जाळी टाकून गव्याला पकडण्याचा प्रयत्न केला खरा परंतू त्याला अपेक्षीत यश आले नाही. अखेर गव्याला दोन इंजेक्शन द्यावी लागली. त्यानंतर गवा संभ्रमावस्थेतून बेशुद्धावस्थेकडे जाताना त्याच्यावर जाळी टाकून आणि दोरखंडाने बांधून त्याला जेरबंद करण्यात आले. जवळपास एक तासभर हा प्रकार सुरु होता. (हेही वाचा, अकोला: आई आलीच नाही! बकरीच्या दूधावर बिबट्याच्या बछड्यांची गुजराण)

जंगलात मुक्त संचार करण्याची सवय असलेला गवा नागरी वस्तीत आला. त्यामुळे नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. माणूस पाहण्याची सवय नसल्याने आणि त्यातही इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी कधीच न पाहिलेला गवा जमाव बघून बिथरला. त्यामुळे तो सैरावैरा धावू लागला. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या होत्या. तरीही वन विभागाला त्याला आवर घालने अथवा पकडणे कठीण जात होते. अखेर तासभर चाललेल्या थरारानंतर गव्याला जेरबंद करण्यात यश आले. (हेही वाचा, Tillari Conservation Reserve Area: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी परिसर 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित)

दरम्यान, गव्यावर शहरातील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. तसेच लोकवस्ती पाहून बिथरलेला गवा इकडेतिकडे धावत होता. या घटनेत गव्याने काही सोसायट्यांमध्ये प्रवेश केला. गव्याच्या प्रवेशाने काही ठिकाणी सोसायट्यांच्या फाटकाचे नुकसान झाल्याचेही पाहायला मिळाले.