Pet Registration Portal: मुंबईमधील पाळीव प्राण्यांची नोंदणी आणि नुतनीकरण करणे अनिवार्य, पोर्टल कार्यरत; जाणून घ्या शुल्क
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit - Pixabay)

पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी (Pet Parents) एक दिलासादायक बाब आहे. पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसाठी आणि पाळीव प्राण्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी बीएमसीचे ऑनलाइन पोर्टल कार्यरत झाले आहे. बीएमसीने शहरातील पाळीव प्राण्यांची नोंदणी अनिवार्य केली आहे. मात्र प्राण्यांचा परवाना नोंदणी आणि नूतनीकरणासाठी वेबसाइटकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. आता अशा तक्रारींनंतर बीएमसीने हे पोर्टल कार्यरत केले आहे.

प्राण्यांच्या मालकांकडे आवश्यक परवाना नसल्यास प्रशासन ते पाळीव प्राणी जप्त करू शकतात, असे निर्देश बीएमसीने यापूर्वी दिले होते. कुत्रा चावण्याच्या आणि प्राण्यांपासून पसरणाऱ्या रोगांच्या वाढत्या घटनांमुळे, बीएमसीने मुंबईतील पाळीव प्राण्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. पाळीव प्राण्यांना रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिसची लस देणे आणि पाळीव प्राण्यांचा परवाना मिळविण्यासाठी शुल्क आकारून सर्व पाळीव प्राण्यांची बीएमसी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

नागरी संस्थेने पाळीव प्राणी परवाना देण्यासाठी 105 रुपये शुल्क आकारून सुरुवात केली आणि दरवर्षी नूतनीकरणासाठी 100 रुपये आकारले जे यावर्षी 700 रुपये करण्यात आले. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारादरम्यान, पाळीव प्राण्यांच्या मोठ्या संख्येने पाळीव प्राण्यांना त्यांचे वार्षिक लसीकरण नियमितपणे मिळावे यासाठी बीएमसीने पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी परवान्यांच्या वार्षिक नूतनीकरणाच्या तरतुदीसह मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली होती.

बीएमसी कायद्याच्या कलम 191(ए) अंतर्गत, पाळीव कुत्र्याने इमारतीच्या सोसायटीमध्ये उपद्रव केल्याचे आढळल्यास किंवा त्याने एखाद्याला चावल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याच्या उद्देशाने पाळीव प्राण्यांच्या पालकांना परवाना घेणे बंधनकारक आहे. अलिकडच्या वर्षांत कुत्रा चावण्याच्या वाढत्या घटनांमुळे, बीएमसीच्या आरोग्य विभागाने नियमांची अंमलबजावणी कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र नोंदणी आणि परवाना नुतनीकरणासाठी असलेले हे पोर्टल कार्यरत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यावर एका पाळीव प्राण्यांच्या पालकाने ट्विटरवर ही समस्या अधोरेखित केली होती. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपण यामध्ये लक्ष घालू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आता हे पोर्टल पुन्हा कार्यरत झाले आहे. (हेही वाचा: नागपूरमध्ये 4 मुलांना HIV ची लागण; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने बजावली महाराष्ट्र सरकारला नोटीस, मागवला अहवाल)

दरम्यान, मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी आणि मानव-कुत्री संघर्ष आणि कुत्रा चावण्याच्या घटना रोखण्यासाठी नागरी अधिकाऱ्यांनी त्यांच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी कार्यक्रमाला गती दिली आहे.