NHRC (File Image)

नागपूर (Nagpur) मध्ये 4 मुलांना रक्त संक्रमणानंतर एचआयव्हीची (HIV) बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठन केली जाणार आहे. आता या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) दखल घेतली आहे. NHRC ने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून सहा आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवला आहे.

या घटनेमध्ये दोषी आढळल्यास लोकसेवक/अधिकारी यांच्यावर कारवाई किंवा प्रस्तावित केलेल्या कारवाईचा समावेश अहवालात अपेक्षित आहे. तसेच मुख्य सचिवांना मरण पावलेल्या मुलाच्या निकटवर्तीयांना दिलेली कोणतीही अंतरिम भरपाई किंवा पीडित मुलांसाठी राज्याने सुरू केलेल्या उपचारांचा अहवाल देण्यास सांगितले आहे.

याशिवाय, महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध विभागाच्या सचिवांना सहा आठवड्यांच्या आत प्राथमिक तपास आणि याप्रकरणी सुरू करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने याआधीच उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.

‘चार बालकांना एचआयव्हीची लागण झाली असून, त्यापैकी एका बालकाचा मृत्यू झाला आहे. आम्ही सर्व माहिती गोळा करून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करू,’ असे आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक डॉ. आर.के. धकाते यांनी सांगितले. थॅलेसेमिया रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रक्ताची न्यूक्लिक अॅसिड टेस्ट (NAT) चाचणी लवकरच केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे. या रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले की, रूग्णांना दूषित रक्त पुरवठा केला जात होता. (हेही वाचा: बनावट शाम्पू, कंडीशनर, बिअर्ड वॉश चे उत्पादन व विक्री; लाखो रुपयांच्या विनापरवाना उत्पादित सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त)

‘उपचारादरम्यान या मुलांची तपासणी केली असता त्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले. रक्तपेढीने त्यांना दूषित रक्त दिल्यानंतर त्यांना एचआयव्ही आणि हेपेटायटीस बीची लागण झाल्याचा आरोप आहे. या आजाराने पीडित बालकांना दिल्या जाणाऱ्या रक्ताची नॅट चाचणी करणे आवश्यक आहे.’