Kishori Pednekar | (Photo Credits: ANI)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांचे कौतुक करत भाजपवर जोरदार निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यांवरही महापौरांनी तिखट प्रतिक्रिया दिली. किशोरी पेडणेकर यांनी बीएमसी आणि राज्य सरकारने कोरोनाच्या काळात उचललेल्या पावलांचे कौतुक केले. महापौर म्हणाल्या, ‘माझ्या कार्यकाळात अनेक गोष्टी घडल्या त्याबद्दल मी देवाचे आभार मानते. फक्त मीच चांगले काम केले असे मी म्हणत नाही. हे काम माझे कर्तव्य होते आणि ते मी मनापासून केले. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानते. माझ्या कार्यकाळात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याशिवाय कोणीही माझ्यावर आरोप केले नाहीत.’

मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित करताना किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, ‘मुंबईकर शिवसेनेसोबत आहेत आणि महापौर शिवसेनेचाच राहणार आहे. दुसरा महापौर निवडून येईपर्यंत मी काळजीवाहू महापौर असेन.’ महापौर म्हणाल्या, ‘भाजपचे आमदार नितेश राणे म्हणतात 24 तास पोलीस काढून टाका मग बघा आम्ही काय करतो. आम्ही म्हणतो, 24 तास ईडी आणि सीबीआय काढा, मग आम्ही बघा काय करतो. आम्ही लोकशाही मार्गाने काम करतो आणि तसेच करत राहू.’

त्या म्हणाल्या, ‘अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि आयकर विभाग लोकांवर कारवाई करतात आणि एकदा हे लोक भारतीय जनता पक्षात सामील झाले की ते क्लीन होतात.’ दिशा सालियनच्या आईकडे महापौर आणि महिला आयोगाचे काही सदस्य गेले होते व त्यांनी दिशाच्या कुटुंबाला भडकावले, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार करत सांगितले की, ‘आम्ही कोणालाही भडकावले नाही. त्यांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे पुरावे आहेत आणि ते सीबीआयला देतील, मग तुम्ही अजून का थांबला आहात? लवकर पुरावे द्या. आम्ही तयार आहोत.’ (हेही वाचा: शिवसेना भवन येथे उद्या अनेक गौप्यस्फोट? संजय राऊत घेणार पत्रकार परिषद)

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन विरोधात पिता-पुत्राने बदनामीकारक टिप्पणी केली होती. नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर सालियनच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी 27 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सालियनच्या आईने आयपीसीच्या कलम 500, 509 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.