Covid-19 Vaccine चे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन होणे बंधनकारक नाही- BMC
BMC | (Photo Credits: Facebook)

मुंबई महानगरपालिकेने प्रवाशांसाठी असलेले क्वारंटाईन नियम काही अंशी शिथील केले आहेत. युरोप (Europe), युके (UK), साऊथ आफ्रिका (South Africa), ब्राझिल (Brazil) आणि मध्य पूर्वेकडील (Middle East) देशांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जर कोविड-19 लसीचे दोन्ही डोस (Covid 19 Vaccine Two Doses) घेतले असतील तर अशा प्रवाशांना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन (Institutional Quarantine) होणे बंधनकारक नसणार आहे. या संबंधित सूचना बीएमसीने (BMC) शनिवारी दिल्या आहेत. बीएमसीचा हा निर्णय अनेक प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

लस घेतलेल्या व्यक्तींव्यतिरीक्त इतर काही व्यक्तींना देखील इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन पासून वगळण्यात आले आहे. यामध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती स्त्रिया आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्ती यांचा समावेश करण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या आदेशानुसार, कुठल्याही आंतरराष्ट्रीय प्रवासानंतर प्रत्येक प्रवाशाला 7 दिवस इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन आणि त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक होते.

जानेवारीत निघालेला हा आदेश सर्वांसाठी अनिवार्य होता. परंतु, आता नव्या निघालेल्या आदेशानुसार कोविड19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या दोन्ही व्यक्तींना इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन व्हावे लागणार नाही. यासोबत 5 वर्षांखालील मुलांसोबत प्रवास करणाऱ्या पालकांना देखील इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन होण्याची गरज नाही. कॅन्सर, मानसिक आजार आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन ठेवण्याची गरज नाही. परंतु, अशा व्यक्तींनी त्यांच्यासोबत त्यांची वैद्यकीय कागदपत्रे बाळगणे गरजेचे आहे. (COVID-19 Spike: मुंबईत मागील 6 दिवसांत 13,000 हून अधिक रुग्णांची भर; 305 इमारती सील)

एखाद्या प्रवाशाच्या कुटुंबामध्ये गंभीर घटना घडल्यास किंवा कोणाचा मृत्यू झाला असल्यास त्याला क्वारंटाईन होणे गरजेचे नाही. यासाठी सदर व्यक्तीला गरज असलेली कागदपत्रे विमानतळावरील अधिकाऱ्यांना दाखवणे गरजेचे आहे. एखाद्या मोठ्या सर्जरीसाठी प्रवास करत असलेल्या आरोग्यसेवकांना देखील इन्स्टीट्युशनल क्वारंटाईन होणे बंधनकारक नाही. यासाठी त्यांना सर्जरीशी निगडित कागदपत्रं दाखवणे गरजेचे आहे.