राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. मुंबईत (Mumbai) देखील कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काल मुंबईत 3 हजार हून अधिक कोविड19 रुग्णांची वाढ झाली असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुंबई पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, 14 मार्च ते 19 मार्च दरम्यान मुंबईत 13 हजार 912 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर कोविड19 चा संसर्ग वाढल्याने 305 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारीच्या मध्यापासून राज्यात कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत अगदी विक्रमी वाढ होत आहे. मात्र यात आठवड्यात रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ झाली. काल मुंबईत एकूण 3,062 नव्या रुग्णांची नोंद झाली.
मुंबईत 7 ऑक्टोबर 2020 मध्ये कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली होती. त्या दिवशी एकूण 2,848 नव्या रुग्णांची वाढ झाली होती. त्यांनतर 18 मार्च रोजी 2,877आणि 19 मार्च रोजी 3,062 रुग्णांच्या नोंदी झाल्या. मात्र कालच्या रुग्णसंख्येने सर्वच रेकॉर्ड ब्रेक केले.
गेल्या सहा दिवसांत मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या कालावधीत कन्टेंमेंट झोन सह सील इमारतींची संख्याही वाढली आहे. 13 मार्च रोजी मुंबईत 31 कन्टेंमेंट झोन होते आणि 220 इमारती सील केल्या गेल्या. कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर कन्टेंमेंट झोनची संख्या 34 झाली असून तब्बल 305 इमारती सील करण्यात आल्या आहेत.
शहरातील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर कडक नियम लागू करण्यात आले आहेत. 22 मार्चपासून मॉल्समध्ये जाण्यासाठी कोविड-19 नकारात्मक अहवाल नकारात्मक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील काही मॉल्सची पाहणी केली आहे.