अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar यांनी विवध खुलासे केले. त्यानंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी ट्विट करत 'माझ्यासाठी हा एक भावनिक आणि कठीण दिवस होता', असे म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर पार्थ पवार हे स्वत: सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांची भेट घेण्यासाठी मुंबईती त्यांच्या सिल्वर ओक या निवास्थानी पोहोचले आहेत. दुसऱ्या बाजूला शरद पवार हेसुद्धा पुण्याहून मुंबईला निघाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अजित पवार यांनी मला राजकारण सोडण्याचा सल्ला दिला आहे. परंतू, ते स्वत: राजकारण सोडणार नाहीत.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले शरद पवार?
आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नव्हती. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. पण, मला त्यांच्या चिरंजीवाकडून काही माहिती समजली त्यावरुन असे दिसते की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात माझे नाव आले त्यामुळे ते उद्विग्न झाले असावेत. सध्या राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला आहे. त्यामुळे आपण राजकारणातून बाजूला होऊन शेती किंवा इतर काही उद्योग केलेला बरा, असा वडीलकीचा सल्लाही अजित पवार यांनी त्यांच्या चिरंजीवाला दिला, असे शरद पवार यांनी या वेळी सांगितले. शरद पवार यांच्या या विधानामुळे अजित पवार हे विद्यमान राजकीय स्थितीबाबत खरोखरच इतके नाराज आहेत का? ते तितके नाराज असतील तर ते खरोखरच राजकारणातून बाहेर पडणार का? यांसारख्या अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिले जात आहेत. (हेही वाचा, अजित पवार राजकारण सोडून करणार शेती, उद्योग?)
पार्थ पवार ट्विट
It’s been an emotional and difficult day for me ...as a head of our family I have conveyed my father’s conversation with me to @PawarSpeaks
— Parth Pawar (@parthajitpawar) September 27, 2019
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंत आपण स्वत:च अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात आपण स्वत:च उपस्थित राहणार अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. त्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे शरद पवार हे अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलीस प्रशासन आणि ईडी कार्यालयाने विनंत केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणे स्थगित केले. त्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी सविस्तर माहिती दिली.