Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे राजकारण सोडून शेती किंवा इतर उद्योग करणार काय? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या काही विधानांमुळे ही चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. ते राजीनामा देणार अशी कोणताही कल्पना पक्षातील नेत्यांना नव्हती. त्यामुळे अजित पवार यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच भूकंप झाला. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत मला कल्पना नव्हती. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी माझा संपर्क होऊ शकला नाही. पण, मला त्यांच्या चिरंजीवाकडून काही माहिती समजली त्यावरुन असे दिसते की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात माझे नाव आले त्यामुळे ते उद्विग्न झाले असावेत. सध्या राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला आहे. त्यामुळे आपण राजकारणातून बाजूला होऊन शेती किंवा इतर काही उद्योग केलेला बरा, असा वडीलकीचा सल्लाही अजित पवार यांनी त्यांच्या चिरंजीवाला दिला, असे शरद पवार यांनी या वेळी सांगितले.

शरद पवार यांच्या या विधानामुळे अजित पवार हे विद्यमान राजकीय स्थितीबाबत खरोखरच इतके नाराज आहेत का? ते तितके नाराज असतील तर ते खरोखरच राजकारणातून बाहेर पडणार का? यांसारख्या अनेक प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चिले जात आहेत. (हेही वाचा, अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार म्हणाले..)

शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंत आपण स्वत:च अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात आपण स्वत:च उपस्थित राहणार अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. त्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे शरद पवार हे अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलीस प्रशासन आणि ईडी कार्यालयाने विनंत केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणे स्थगित केले. त्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी सविस्तर माहिती दिली.