महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण (Maharashtra Cooperative Bank Scam Case), अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate), अजित पवार (Ajit Pawar) यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा या पार्श्वएभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (27 सप्टेंबर 2019) विस्ताराने भूमिका मांडली. अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत मला यत्किंचीतही कल्पना नव्हती. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर माझ्याशी चर्चा केली नव्हती. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी कुणाशीच संपर्क साधला नाही. कुटुंबप्रमुख म्हणून मी या विषयात नक्की लक्ष घालणार असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात नाव आल्यानंत आपण स्वत:च अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात आपण स्वत:च उपस्थित राहणार अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. त्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे शरद पवार हे अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात जाण्यासाठी निघाले. मात्र, पोलीस प्रशासन आणि ईडी कार्यालयाने विनंत केल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शरद पवार यांनी ईडी कार्यालयात जाणे स्थगित केले. त्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी सविस्तर माहिती दिली.
या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले, राज्य बँक घोटाळा प्रकरणात माझे नाव आल्याचे अजित पवार यांना आवडले नसावे. त्यांना या गोष्टीचा प्रचंड त्रास झाला असावा. त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मला कळली. पण, त्यांनी नेमका कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे समजू शकले नाही. मी त्यांच्या चिरंजीवाशी संपर्क साधला असता, 'सध्याची राजकारणाची पातळी कमालिची घसरली आहे. त्यामुळे राजकारण सोडून शेती उद्योग केलेला बरा असा सल्ला त्यांनी दिला', असे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत सांगितले. दरम्यान, अद्याप आपली आणि अजित पवार यांची भेट झाली नाही, असेही शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, धक्कातंत्र? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ)
'अजित पवार लढवय्ये'
अजित पवार हे लढवय्ये आहेत. थोड्याशा कारमामुळे तलवार म्यान करणे हा त्यांचा स्वभाव नाही. परंतू, तडखाफडकी निर्णय घेणे हा त्यांचा स्वभाव मला माहित आहे. पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून मी या प्रकरणीत लक्ष घालीन असेही शरद पवार या वेळी म्हणाले.