धक्कातंत्र? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा आमदारकीचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे (Nationalist Congress Party) नेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या विधानसभा (Maharashtra Legislative Assembly) सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. प्राप्त माहितीनुसार, हरीभाऊ बागडे यांनी अजित पवार यांचा राजीनामा सोपवला आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. या राजीनाम्याचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. विद्यमान विधानसभेला अवघा एक महिन्यांचा कालावधी बाकी राहीला असताना अजित पवार यांनी अचानक दिलेला राजीनामा हा अनेकांसाठी भूवया उंचावणारा ठरला आहे. महत्त्वाचे असे की, अजीत पवार यांनी नेमका कोणत्या कारणासाठी राजीनामा दिला? या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप समजू शकले नाही.

अजित पवार यांनी नेमका कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (हेही वाचा, अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत शरद पवार म्हणाले..)

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, अजित पवार यांनी माझ्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांनी आपण विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. मी त्यांना विचारले दादा राजीनामा का देता आहात? यावर ते म्हणाले मी आता हे सांगू शकत नाही. त्यानंतर त्यांनी सागर नावाच्या माझ्या पीएकडे राजीनामा दिला. अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारल्याचेही हरीभाऊ बागडे यांनी सांगितले.