Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरुद्ध काढण्यात आलेले अटक वॉरंट परळी कोर्टाने (Parli Court) रद्द केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कोर्टाने त्यांना 500 रुपयाचा दंड मात्र ठोठावला आहे. सन 2008 मध्ये परळी पोलिसांमध्ये दाखल एका जुन्या गुन्ह्यात राज ठाकरे यांचेही नाव आहे. त्यामुळे न्यायालयात हजर राहण्याबाबत राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात आले होते. अनेकदा समन्स बजावूनही कोर्टात गैरहजर राहिल्याने राज यांच्याविरोदात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे परळी येथे आले होते.

राज ठाकरे यांच्याकडून हुरडा पार्टी

राज ठाकरे यांनी परळीला अगदी धावती भेट दिली. कोणतेही राजकीय कार्यक्रम, गाठीभेटी न घेता राज ठाकरे थेट परळी न्यायालयात आले. तिथे त्यांनी न्यायालयीन औपचारिकता पूर्ण केली आणि ते मुंबईसाठी रवाना झाले. दरम्यान, मुंबईहून परळीला जाताना राज ठाकरे यांचे हेलिकॉप्टर औरंगाबाद येथील पळशी रिसॉर्टवर उतरले. तेथे मनसे कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत केले. दरम्यान, पळी रिसॉर्टपासून अवघ्या काहीच अंतरावर असलेल्या एका ठिकाणी त्यांनी हुरडा पार्टीचा आस्वाद घेतला. तिथून ते परळी कोर्टाकडे निघाले. (हेही वाचा, Raj Thackeray Welcome by NCP: राज ठाकरे यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते; परळी येथे जेसीबीतून उधळली फुले, स्वागताला 50 फुटांचा हार)

राज ठाकरे यांची एन्ट्री, राष्ट्रवादीकडून स्वागत

परळी कोर्टाकडे जात असताना. परळी ग्रामस्थांनी राज ठाकरे यांचे भव्य स्वागत केले. या स्वागतामध्ये धनंजय मुंडे आणि पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अग्रेसर होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी राज ठाकरे यांच्या स्वागतार्थ जेसीबीमधून फुलांची उधळण केली. याशिवाय राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी तब्बल 50 फुटांचा हारही आणण्यात आला होता.

'स्वागताचा राजकीय अर्थ काढू नका'

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार म्हणून आज सकाळपासूनच परळीमध्ये लगबग होती. दरम्यान, राज ठाकरे यांचे होणारे स्वागत मनसे कार्यकर्त्यांकडून केले जात असेल, असा सर्वांचाच समज होता. मात्र, हे स्वागत मनसे नव्हे तर राष्ट्रवादीकडून केले जात असल्याने अनेकांना धक्का बसला. एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या लाईव्ह वृत्तानुसार, परळीच्या सरपंचांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, या स्वागताचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. या स्वागताला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. राज ठाकरे यांच्यासारखा लोकप्रिय नेता, तडफदार वक्तृत्व लाभलेले नेतृत्व जर परळीमध्ये येत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ पाहूणचार एवढ्या अर्थानेच आपण त्यांचे स्वागत केल्याचे परळीच्या सरपंचांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये दगडफेक आणि जाळपोळ केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये राज ठाकरे यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अनेकदा नोटीस काढूनही न्यायालयात हजर न झाल्याने परळी कोर्टाने (Parli Court) राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे आज परळी कोर्टात हजर होत आहेत. तत्पूर्वी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.