महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे परळी (Parli) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP ) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत (Raj Thackeray Welcome by NCP Party Workers) केले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्यावर परळी येथे जेसीबीतून फुले उधळण्यात आली. तसेच, त्यांच्या स्वागतासाठी 50 फूटांचा भव्य हारसुद्धा आणण्यात आला होता. परळी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात आणि त्यातही राष्ट्रवादीचे टीकाकार असलेल्या राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण झाल्याने अनेकांच्या भूवया सहाजिकच उंचावल्या. मात्र, परळीचे सरपंच सुशील कराड यांनी लागलीच खुलासा केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार म्हणून आज सकाळपासूनच परळीमध्ये लगबग होती. दरम्यान, राज ठाकरे यांचे होणारे स्वागत मनसे कार्यकर्त्यांकडून केले जात असेल, असा सर्वांचाच समज होता. मात्र, हे स्वागत मनसे नव्हे तर राष्ट्रवादीकडून केले जात असल्याने अनेकांना धक्का बसला. एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या लाईव्ह वृत्तानुसार, परळीच्या सरपंचांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, या स्वागताचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये. या स्वागताला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. राज ठाकरे यांच्यासारखा लोकप्रिय नेता, तडफदार वक्तृत्व लाभलेले नेतृत्व जर परळीमध्ये येत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ पाहूणचार एवढ्या अर्थानेच आपण त्यांचे स्वागत केल्याचे परळीच्या सरपंचांनी सांगितले. (हेही वाचा, Raj Thackeray यांची चंद्रपूरात केक खरेदी, एक दोन नाही तर तब्बल चार केक विकत घेत राज ठाकरे म्हणाले..)
व्हिडिओ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये दगडफेक आणि जाळपोळ केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांवरही दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये राज ठाकरे यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामुळे राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अनेकदा नोटीस काढूनही न्यायालयात हजर न झाल्याने परळी कोर्टाने (Parli Court) राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. त्यामुळे राज ठाकरे आज परळी कोर्टात हजर होत आहेत. तत्पूर्वी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.