औरंगाबादजवळील पैठण (Paithan) येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा (Sant Dnyaneshwar Udyan) संपूर्ण कायापालट करून, देश-विदेशातील पर्यटकांना तिथे आकर्षित करण्यासाठी लोकांकडून नाविन्यपूर्ण कल्पना तर मागवाच तसेच जागतिक स्तरावरील सल्लागार देखील नियुक्त करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. वर्षा येथील समिती सभागृहात यासंदर्भात मंगळवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या उद्यानाची जागा 310 एकर असून मधल्या काळात त्यातील काही भाग कृषी, वन तसेच पर्यटन विभागाला देण्यात आला होता. आता सुमारे 200 एकर जागेवर उद्यान आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, पैठणला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. औरंगाबाद परिसरात आलेले पर्यटक आवर्जून पैठण येथे भेट देतात. याठिकाणी जायकवाडीसारखे देशातले मोठे धरण आहे. त्यामुळे या संत ज्ञानेश्वर उद्यानाची दूरवस्था दूर करून जागतिक दर्जाचे उद्यान याठिकाणी बनले पाहिजे. यासाठी लोकांमधून चांगल्या नाविन्यपूर्ण कल्पना मागवा तसेच जागतिक स्तरावरील सल्लागार नेमण्याची प्रक्रिया लगेच सुरु करा असे त्यांनी जलसंपदा विभागाला सांगितले.
यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील जायकवाडीप्रमाणे इतरही धरणांच्या परिसरात पर्यटनाच्या संधी असून या सगळ्यांचा सुद्धा विकास केला गेला तर पर्यटन व इतर उद्योग वाढतील असे सांगितले. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमटीडीसीच्या सात जागा विकसित करणे सुरु असून संत ज्ञानेश्वर उद्यानासारखी मोठी जागा विकसित करताना उत्कृष्ट नियोजन करावे व त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार असावा अशी सूचना केली. (हेही वाचा: रणजीत सिंह डिसले गुरुजींनी दाखवलेल्या दातृत्वामुळे महाराष्ट्राची मान जगात उंचावली- राज ठाकरे)
प्रारंभी जलसंपदा प्रधान सचिव लोकेश चंद्र यांनी सांगितले की, हे उद्यान 2002 साली प्रायोगिक तत्वावर देखभालीसाठी एका खासगी संस्थेला दिले होते. मात्र त्याची व्यवस्थित देखभाल होऊ शकली नव्हती म्हणून 2011 मध्ये परत जलसंपदा विभागाने त्याची जबाबदारी घेतली होती. विभागाने सौंदर्यीकरणासाठी 40 कोटींचा प्रस्ताव केला आहे. याठिकाणी वॉटर पार्क, खेळणी व प्राणीसंग्रहालय, थीम पार्क उभारण्याचे नियोजन आहे.