लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चीनच्या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद; राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून वाहली श्रद्धांजली
File Image of NCP chief Sharad Pawar | (Photo Credits: PTI)

लडाखच्या (Ladakh) गलवान खोऱ्यात (Galwan Valley) चीनी सैनिकांसोबत झालेल्या अतिक्रमणात भारताचे जवळपास 20 सैनिक हुतात्मा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, चीन सैन्यातील 43 जण गंभीर झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यातील काहींचा मृत्यू झाल्याची शक्यताही 'एएनआय' वृत्तसंस्थेने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्वीटरच्या माध्यामातून शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहली आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये चिनी अतिक्रमणापासून आपल्या सीमेचे रक्षण करताना भारतीय लष्करी अधिकारी व जवानांना वीरगती मिळाली. आपले सैन्यदल धैर्याने आणि दृढनिश्चयाने भारतीय सीमांचे रक्षण करत आहे. वीरमरण प्राप्त सैनिकांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली!, अशा आशायाचे शरद पवार यांनी ट्विट केले आहे.

भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये सोमवारी रात्री हिंसक झटापट झाली आहे. यावेळी कोणताही गोळीबार झाला नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट सांगितले आहे. पण यावेळी दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले होते. यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. त्यावेळी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे. मात्र, या संख्येत वाढ झाली असून भारतीय सैन्यातील जवळपास 20 सैनिक शहिद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे. हे देखील वाचा- राष्ट्रवादीच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यपालनियुक्त आमदार होणार

शरद पवार यांचे ट्विट-

15 जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचे नुकसान झाले. चीनकडून 6 जून रोजी दोन्ही देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यावर तसेच वाद कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी झालेल्या सहमतीचे उल्लंघन करण्यात आले. मात्र, सीमा परिसरात शांतता नांदली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे या भूमिकेवर आम्ही अद्यापही ठाम आहोत. पण याचवेळी भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.