Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

नागपूर (Nagpur) जवळील आदासा (Adasa) येथील कोळसा खाणीचे (Coal Mine) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ऑनलाईन उद्धाटन (Online Inauguration) करण्यात आले आहे. तसेच मध्यप्रदेशातील कोळसा खाणीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. मात्र, तरीदेखील आपण कोळशाची बाहेरून आयात करतो. कोळशाचे वीज निर्मितीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण दर्जेदार कोळशाची उत्पादन क्षमता संपूर्णपणे उपयोगात आणली, तर वीज निर्मितीचा प्रश्न मिटेल. तसेच संपूर्ण ग्रामीण भागाला अव्याहतपणे परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज पुरवठा करता येईल, असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडलं.

दरम्यान, यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी, यांनी आपलं मत मांडलं. कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय. खाणींमधून निघणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रदूषित होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचतो. श्वसन व इतर आजार उद्भवतात. त्यामुळे खाणींतील प्रदूषण कमी व्हावे, या सर्व खाणी पर्यावरणपूरक असाव्यात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. (वाचा - Coronavirus: सातारा जिल्ह्यात आज 19 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, तर 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू)

आज भारत स्वातंत्र्य होऊन इतकी वर्षे झाली पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या विजेविषयीच्या मागण्या आणि अपेक्षा शंभर टक्के पूर्ण झाल्या असे म्हणता येत नाही. अजूनही भारनियमन पूर्णपणे बंद करणे, परवडणाऱ्या दरात व अखंडित वीज पुरवठा देणे या गोष्टींची पूर्तता करावी लागेल. कोळशातील राखेचे प्रमाण कमी करणे आवश्यक. त्यासाठी वॉशरीज चांगल्या हव्यात. उत्पादन पूर्ण झाल्यावर खाणी बंद करताना त्या तशाच न सोडता त्यावर झाडे लावून जंगल तयार केल्यास पर्यावरणाला मदत होईल. खाणी बंद करण्याचा कालावधी देखील निश्चित केला पाहिजे, असं मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी मांडलं.

मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक कळ दाबून ऑनलाईन पद्धतीने आदासा खाणीच्या कामाचा शुभारंभ केला. आदासा खाणीत 334 कोटी रुपये गुंतवणूक केली जात आहे. या खाणीतून 1.5 दशलक्ष टन कोळसा उत्पादन होणार आहे. त्यामुळे 550 जणांना रोजगार मिळणार आहे.