Ashti-Ahmednagar Railway: अहमदनगर ते आष्टी रेल्वे मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन; आजपासून ‘डेमू रेल्वे’ सेवेला सुरुवात
Online inauguration of Ahmednagar to Ashti railway line by CM Eknath Shinde (PC - Twitter)

Ashti-Ahmednagar Railway: गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गातील पहिल्या टप्प्यातील अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्गाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. आजपासून अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी 'डेमू रेल्वे' सेवा सुरु झाली आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, बाळासाहेब विखे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, रेल्वेकडून 24 सप्टेंबरपासून चालवल्या जाणार्‍या रेल्वेसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. रविवार वगळता आठवड्यातील सहा दिवस नगर-आष्टी आणि आष्टी-नगर या मार्गावर ही रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही रेल्वे नगरहून निघाल्यानंतर नारायणडोह, नवीन लोणी, सोलापूरवाडी, नवीन धानोरा, कडा या स्थानकांवर थांबा घेईल. (हेही वाचा - No-Poaching Agreement: गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यात महत्त्वपूर्ण करार; एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना देणाऱ्या नाहीत नोकऱ्या)

वास्तविक, अहमदनगर ते आष्टी पहिली ट्रेन दररोज सकाळी 7.45 ला सुटणार आहे. ही ट्रेन आष्टीत 10.30 वाजता पोहोचेल. आष्टीहून सकाली 11 वाजता ट्रेन सुटेल, तर नगरमध्ये ही ट्रेन दुपारी 1.55 वाजता पोहोचणार आहे. यासंदर्भात रेल्वेने वेळापत्रक जाहीर केलं आहे.

अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. मागील महिन्यांमध्ये या रेल्वे मार्गावरील चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे नगर तसेच बीडमधील नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर आज त्यांचे स्वप्न सत्यात उतरलं आहे. आता नागरिक अहमदनगर-आष्टी असा रेल्वे प्रवास करू शकतात.