No-Poaching Agreement: गौतम अदानी, मुकेश अंबानी यांच्यात महत्त्वपूर्ण करार; एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना देणाऱ्या नाहीत नोकऱ्या
Gautam Adani, Mukesh Ambani (PC - Instagram, Wikimedia Commons)

No-Poaching Agreement: आशियातील दोन सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी 'नो पोचिंग' करारावर (No-Poaching Agreement) स्वाक्षरी केली आहे. या अंतर्गत अदानी समूहाचे कर्मचारी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करू शकणार नाहीत किंवा मुकेश अंबानींच्या कंपनीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना अदानी समूह कामावर घेणार नाही. हा करार या वर्षी मे महिन्यापासून लागू होणार असून दोन्ही कंपन्यांशी संबंधित सर्व व्यवसायांसाठी हा करार लागू असणार आहे.

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टमध्ये यासंदर्भआत माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, या कराराशी संबंधित प्रश्नांची उत्तरे अद्याप अदानी समूह किंवा रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देण्यात आलेली नाहीत. (हेही वाचा - Rupee Fall Impact: डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला; सर्वसामान्यांवर होणार 'असा' परिणाम)

काय आहे 'नो पोचिंग' कराराचे कारण?

'नो पोचिंग' करार महत्त्वाचा आहे कारण, अदानी समूह आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे वर्चस्व असलेल्या व्यवसायात प्रवेश करत आहे. गेल्या वर्षी, अदानी समूहाने अदानी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड सोबत पेट्रोकेमिकल क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा केली. या क्षेत्रात रिलायन्सची सर्वात मोठी उपस्थिती आहे. त्याचवेळी अदानी समूहाने टेलिकॉम क्षेत्रातही आपले पहिले पाऊल टाकले आहे. अलीकडेच अदानीने 5G स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. त्याचबरोबर हरित ऊर्जा क्षेत्रात अदानी आणि अंबानी एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनताना दिसत आहेत. तसेच माध्यमांमध्ये मुकेश अंबानी यांच्यानंतर आता अदानी समूहाने प्रवेश केला आहे.

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यातील करारामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे रस्ते बंद झाले आहेत. रिलायन्समध्ये 3.80 लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. या करारामुळे अदानी समूहाचे हजारो कर्मचारी मुकेश अंबानींच्या कोणत्याही कंपनीत काम करू शकणार नाहीत.

दरम्यान, 'नो पोचिंग' कराराची प्रथा भारतात प्रचलित नसली तरी आता ती मोठ्या प्रमाणात प्रचलित होत आहे. टॅलेंट वॉर आणि पगारवाढ यामुळे कंपन्या 'नो पोचिंग' करारासाठी आग्रही आहेत. कर्मचाऱ्यांची मागणी किंवा वाढलेले पगार हे कंपन्यांसाठी धोक्याचे आहे.