Rupee Fall Impact: डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला; सर्वसामान्यांवर होणार 'असा' परिणाम
Representational Image (Photo Credits: File Image)

Rupee Fall Impact: भारतीय चलन रुपयात कमालीची घसरण होत असून आज तो डॉलरच्या तुलनेत 81 रुपये प्रति डॉलर देखील पार केला आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया 81.20 रुपयांपर्यंत घसरला होता आणि कालच्या तुलनेत त्यात 41 पैशांची मोठी घसरण पाहायला मिळाली. रुपया 81.20 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर आला असून त्यामुळे चलन बाजार तज्ञ ते आयातदार आणि व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम -

रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे परिणाम होतो. कमजोर रुपयामुळे आयात महाग होते आणि देशांतर्गत उत्पादन आणि जीडीपीला धक्का बसतो. रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर तसेच सर्वसामान्यांच्या बजेटही मोठा परिणाम होतो. (हेही वाचा - Bank Holidays October 2022: ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका; शाखेत जाण्यापूर्वी येथे पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी)

कच्चे तेल महागणार -

भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. डॉलरच्या किमतीमुळे कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी अधिक खर्च येईल. कारण कच्च्या तेलाचे पेमेंट डॉलरमध्ये जाते. यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यास भाजीपाल्यापासून ते दैनंदिन वस्तूंच्या वाहतुकीच्या खर्चावर खोलवर परिणाम होऊन सर्व प्रकारच्या वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल. रुपयाच्या कमजोरीचा सर्वाधिक परिणाम महागाईवर होण्याची शक्यता आहे.

ग्राहकोपयोगी वस्तू महाग होतील -

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत घसरल्याने आयात करण्यात येत असलेले भाग महाग होतील. ज्याचा ग्राहक टिकाऊ वस्तू उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल. टीव्ही, फ्रीज, एसीपासून ते अनेक नियमित मागणी असलेल्या वस्तूंमध्ये आयात केलेले भाग वापरले जातात. रुपयाची घसरण झाल्याने आयात करण्यात येणाऱ्या वस्तू आता महाग होणार आहेत.

उत्पादन महाग होण्याची भीती -

रत्ने आणि दागिन्यांसह, पेट्रोलियम उत्पादने, ऑटोमोबाईल, मशिनरी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी उत्पादन खर्च वाढतो. यामुळे त्यांच्या मार्जिनवर परिणाम होतो. त्यामुळे या क्षेत्रांशी संबंधित उत्पादने महाग होतात.

परदेशात जाणं महागणार -

रुपयाचे अवमूल्यन आणि डॉलर महाग झाल्याने तुम्हाला एका डॉलरसाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. यामुळे परदेशात सुट्या आणि उपचारांचा खर्च वाढणे स्वाभाविक आहे. कारण या सर्वांवर डॉलरमध्ये खर्च करावा लागतो. रुपयाच्या घसरणीमुळे परदेश प्रवास आता पूर्वीपेक्षा जास्त महागणार आहे.

परदेशात शिक्षण घेणं महाग होणार -

परदेशी शैक्षणिक संस्थांकडून फी म्हणून आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक डॉलरसाठी तुम्हाला अधिक रुपये खर्च करावे लागतील. यामुळे तुमच्या शिक्षणाचा एकूण खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढेल.

मोबाईल फोन महागणार -

रुपयाच्या घसरणीचा सर्वात जास्त परिणाम अशा वस्तूंवर होतो ज्यात आयात केलेले भाग वापरले जातात. भारतात या श्रेणीत सर्वाधिक मागणी असलेली वस्तू म्हणजे मोबाईल फोन. मोबाईल फोनच्या महागड्या भागांमुळे त्यांच्या उत्पादनापासून ते असेंबलिंगपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च वाढतो. त्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.