Onions (Photo Credits: IANS)

सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या दरावरून (Onion Price) बराच वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की सोलापुरातील बोरगाव येथील शेतकरी 512 किलो कांदा विकण्यासाठी 70 किलोमीटरचा प्रवास करून एपीएमसी मंडईत पोहोचला. तिथे त्याचा कांदा फक्त एक रुपये किलो दराने विकला गेला. आता कांद्याचे भाव घसरल्याने व्यथित झालेल्या नाशिक जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या पिकाची होळी केली आहे.

होलिका दहनाच्या दिवशीच या शेतकऱ्याने आपले पीक पेटवून दिले आहे. नाशिकमधील आशियातील सर्वात मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांद्याचे भाव 2 रुपयांनी घसरून 4 रुपये प्रतिकिलोपर्यंत आले आहेत. यामुळे उत्पादक संतप्त झाले असून, गेल्या आठवड्यात एपीएमसीमधील लिलाव एका दिवसासाठी थांबवला होता.

आता येवला तालुक्यातील कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने दीड एकर जमिनीवर लावलेले कांद्याचे पीक जाळून टाकले. शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी सांगितले की, दीड एकरात हा कांदा पिकवण्यासाठी त्यांनी चार महिने अहोरात्र मेहनत घेतली होती. मात्र आता राज्य व केंद्र सरकारच्या चुकांमुळे पिके जाळण्यास भाग पाडले जात आहे. डोंगरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहून कांदा जाळण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते, जेणेकरून ते स्वत: शेतकऱ्यांची स्थिती पाहू शकतील. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

डोंगरे यांनी सरकारच्या धोरणांवर ठपका ठेवत केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. आपल्या सत्तेच्या संघर्षात शेतकरी जगतोय की मरतोय याकडे सरकारचे लक्ष नसल्याचे ते म्हणतात. अशाप्रकारे राज्यातील एका शेतकऱ्याला कांद्याची होळी करावी लागत असल्याने, हा केवळ महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी काळा दिवस आहे. शेतकऱ्याच्या या आंदोलनावेळी आजूबाजूच्या गावातील शेतकरीही उपस्थित होते. (हेही वाचा: Maharashtra: कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंत्र्यासमोरच घातला गोंधळ)

कांद्याचे भाव घसरल्याने नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्याच्या इतर भागातील शेतकरी संतप्त झाले असून विविध ठिकाणी ते आंदोलन करत आहेत. गेल्या आठवड्यात चांदवडसह जिल्ह्याच्या इतर भागात आणि राज्यभरात अशीच आंदोलने झाली. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे रविवारी संतप्त शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांना घेराव घातला होता. केंद्राने कांद्याची निर्यात वाढवली असे सांगत, कांद्याला चांगला भाव का मिळत नाही?, असा सवाल त्यांनी केला. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने तात्काळ कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान जाहीर करावे आणि सध्या 3,4,5 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कांद्यासाठी 15 ते 20 रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणी एका शेतकरी नेत्याने केली होती.