Omicron: मुंबईत AP Dhillon च्या कॉन्सर्टसाठी उसळली गर्दी; Covid-19 नियमांचे उल्लंघन, आयोजकांवर FIR दाखल
AP Dhillon (Photo Credits: Instagram)

देशात कोरोनाचा नवीन प्रकार म्हणजेच ओमायक्रॉनची (Omicron) प्रकरणे वेगाने वाढत आहेत, त्यामुळे लोकांमधील भीतीचे वातावरणही वाढत आहे. ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पोलिसांनी शहरात मिरवणूक, रॅली आणि मोर्चाला बंदी घातली आहे. अशात काल रात्री मुंबईत प्रसिद्ध गायक आणि रॅपर एपी धिल्लन (AP Dhillon) याचा कार्यक्रम पार पडला. याठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते तसेच या कार्यक्रमात अनेक कोविड नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी आयोजकावर एफआयआर नोंदवला आहे.

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान, जान्हवी कपूर आणि इब्राहिम अली खान यांनीही या कॉन्सर्टमध्ये हजेरी लावल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. यांच्याशिवाय इतर अनेक बॉलिवूड स्टार्स या कॉन्सर्टमध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरही स्पॉट झाला होता. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबवत आहे, त्यामुळे रॅली आणि गर्दीबाबत विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत दोन दिवस मेळावे आणि रॅली बंद करण्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.

अशी परिस्थिती असूनही शहरात इतक्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई पोलिसांना या कॉन्सर्टची आधीच माहिती होती आणि नियमानुसार आयोजकांनी ठरलेल्या लोकांच्या संख्येसोबत कॉन्सर्ट पार पाडायचा होता, मात्र निर्धारित संख्येपेक्षा जास्त लोकांना बोलावून आयोजकांनी कोविड-19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केले. तसेच इतर अनेक नियमही मोडल्याचे दिसून आले आहे. यानंतर पोलिसांनी आयोजकांविरुद्ध साथीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा: Maharashtra: राज्यात 100 टक्के लसीकरणानंतरच बूस्टर डोसचा विचार केला जाईल- अजित पवार)

दरम्यान, कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागला आहे. देशात ओमायक्रॉन प्रकाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र भाजप नेते डॉ. संजय पांडे म्हणतात की, 'महाविकास आघाडी सरकारने मुंबईत कलम 144 केवळ मुंबईतील गरिबांना त्रास देण्यासाठी लागू केले आहे, तर श्रीमंत आणि व्हीआयपी त्याचा प्रचंड गैरवापर करत आहेत. यावरून मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेचा निव्वळ ढोंग झाल्याचे दिसून येत आहे.