कोणी कितीही हेल्थ फ्रीक असले तरी रस्त्यावर गरमागरम पाणीपूरी, पावभाजी , चायनीज असे सगळे पदार्थ पाहिले की लगेच जाऊन खाण्याचा मोह आवरणं शक्य होत नाही. मात्र अशा वेळी जर का विक्रेत्यांनी भेसळयुक्त किंवा अस्वच्छ पदार्थ आपल्याला खाऊ घातले तर मात्र नंतर आरोग्याच्या नाना प्रकारच्या समस्या समोर येऊन उभ्या ठाकतात, अन्नातून विषबाधा, पोटाचे विकार यांसारखे गंभीर आजार उद्भवतात. मात्र याबाबात आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून नामी उपाय शोधण्यात आला आहे, यापुढे राज्यातील सर्व हातगाड्यांवर अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नेमून दिलेला ड्रेसकोड लागू घालणे अनिवार्य असणार आहे. या ड्रेसकोडचे वैशिष्ट्य असे की यातून विक्रेता उघड्या हाताने किंवा थेट पदार्थाला स्पर्श करू शकणार नाही परिणामी अन्नाचा दर्जा टिकवून ठेवण्यात मदत होईल. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या पुढाकारातून ही मोहीम लागू करण्यात आली आहे. याची सुरुवात सध्या बुलडाण्यातून (Buldhana) करण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नुकतेच या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बुलढाणा येथील चिंचोले चौकातील हातगाडीवर पाणीपुरी, पाव-भाजी, भेळ, चायनीज, आईस्क्रीम इत्यादी अन्नपदार्थ विक्रेत्यांना नव्या ड्रेसकोडचे वाटप केलं आहे. यात अॅप्रॉन, हँडग्लोज आणि कॅपचा समावेश आहे. सर्व खवय्यांना स्वच्छ आणि शुद्ध खाद्यपदार्थ मिळावे यासाठी चांगल्या आणि स्वच्छ वातावरणात हातगाडीवर अन्नपदार्थांची विक्री व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवयात येत असल्याचे शिंगणे यांनी सांगितले.अहमदनगर: पाणीपुरीच्या ठेल्यावरील पाण्यात सापडल्या जिवंत अळ्या
यासोबतच, यापुढे हातगाडीवर पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने आणि स्वच्छता नेटाने तपासली जाणार आहे. हाताची, नखांची स्वच्छता तसेच या विक्रेत्यांना कुठला त्वचा रोग आहे का, त्याचीही आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या नियमाचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर एक रुपयांपासून ते एक लाख रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.