पाणीपुरी (Panipuri) फुकट खाण्यासाठी दिली नाही या कारणास्तव स्थानिक गुंड आणि फुकटखाऊंनी एका पाणीपुरीवाल्याला केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना कानपूरमधील सफीपूर येथे रविवारी (14 जानेवारी) रात्री घडली. प्रेमचंद्र निषाद असे दुकानदाराचे नाव आहे. मारहाण झाल्यानंतर रात्री उशिरा घरी पोहोचलेल्या प्रेमचंद्र यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्रेमचंद्र निषाद यांच्या पत्नीने पोलिसांमध्ये (Kanpur Police) आरोपींविरोधात हत्येची (Murder) तक्रार दिली आहे.
फुकट पाणीपुरीवरुन गुंडांशी वाद
कानपूर देहाटमधील मुसानगर येथे राहणारे 40 वर्षीय प्रेमचंद्र हे आपल्या कुटुंबासह सफीपूर, चकेरी भागात निवासास होते. पत्नी शशी देवी, मुलगा अनुज आणि मुली मानसी, प्रियांशी आणि दिव्यांशी, असे हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. प्रेमचंद्र पाणीपुरीचा गाडा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. प्राप्त माहितीनुसार, त्यांनी नेहमीप्रमाणे सफीपूर मोड भागात आपला गाडा लावला होता. आपला धंदा झाल्यावर दुकान (गाडा) बंद करुन ते घरी निघाले होते. या वेळी स्थानिक गुंड आणि त्यांच्या चार साथीदारांनी प्रेमचंद्र यांच्याकडे पाणीपुरीची मागणी केली. तसेच, ही पाणीपुरी त्यांनी फुकट मागितली. ज्यामुळे हे गुंड चिडले आणि त्यांनी प्रेमचंद्रला शिवीगाळ करत मारहाणही सुरु केली. (हेही वाचा, पहावं ते नवलचं ! लग्नात नववधूची पाणी पुरीच्या पुऱ्यांचे मुकूट आणि माळ घालून हटके फॅशन, ट्रेडिशनल लूकसह अनोखा प्रकार केल्याने Video झाला व्हायरल)
उपचारापूर्वीच मृत्यू
दरम्यान, पाणीपुरीवाल्यासोबत सुरु असलेली झटापट पाहून स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी त्याचा बचाव केला आणि त्याला घरी पाठवले. पण, तोवर त्याला अंतर्गत जखमा झाल्या होत्या. तो आपल्या घरी पोहोचला. त्याने आपल्या पत्नीला घडलेली घटना सांगितली. दरम्यान, रात्रीच्या सुमारास प्रेमचंद्र यांची प्रकृती अचानक खालावत गेली. कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उरसाळा येथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि प्रेमचंद्रच्या कुटुंबीयांनी गुंड आणि त्याच्या साथीदारांवर हत्येचा आरोप करत तक्रार दाखल केली. (हेही वाचा, Panipuri Ban in Kathmandu: नेपाळ सरकारने काठमांडूमध्ये पाणीपुरीवर घातली बंदी; जाणून घ्या काय आहे यामागच कारण)
पोलिसात तक्रार दाखल
चकेरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अशोक दुबे यांनी तक्रार दाखल झाल्याची पुष्टी केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, असे सांगितले. डीसीपी पूर्व तेज स्वरूप सिंह यांनी नमूद केले की, मारहाण झाल्याची घटना घडली असली तरी मृत प्रेमचंद्र यांच्या शरीरावर कोणतीही जखम दिसली नाही. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्षांवर तपास अवलंबून असेल आणि समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारे पोलिस योग्य ती कारवाई करतील.